Published on
:
16 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:45 am
रत्नागिरी : मागील पंधरा वर्षे आमदार म्हणून काम करताना ‘मविआ’च्या उमेदवाराने राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात फारसे योगदान दिलेले नाही. त्यामुळे यापुढे ‘आमचे एकच तत्त्व, जनतेच्या कामाला महत्त्व’ असा नारा महायुती शिवसेनेचे उमेदवार किरण ऊर्फ भय्या सामंत यांनी दिला आहे. जाहीरनाम्या ऐवजी त्यांनी 15 विविध विषयांवर वचननामा प्रसिद्ध केला आहे.
राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघाचा विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे या भागात चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावात घरे बंद करून नोकरी, व्यवसायानिमित्त येथील जनता बाहेर गावी आहे. गणपती, शिमगोत्सवाला गावे भरुन जातात, त्यानंतर मात्र शुकशुकाट असतो, ही परिस्थिती बदलायची असल्याचे मत किरण सामंत यांनी व्यक्त केले.
या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा व जलसिंचन, शैक्षणिक सुविधा, उद्योग व रोजगार, वाहतूक दळणवळण, कृषी व फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास, पर्यटन विकास, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, शहर विकास, पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक विकास, क्रीडा व कला आणि प्रशासकीय सुधारणा हे विषय भविष्यातील कामाच्या अग्रस्थानी असणार आहेत. यालाच धरून आपण जनतेला वचनबद्ध राहणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.(Maharashtra assembly poll)
सह्याद्रीच्या कड्यापासून अरबी सागरापर्यंत राजापूर तालुका पसरला असून, मध्यवर्ती महामार्गामुळे याचे दोन भाग झाले आहे. परंतु किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातही आरोग्य सुविधांची वाणवा असून याठिकाणी किरण सामंत यांनी महायुतीच्या प्रयत्नातून ओणी येथे 100 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या 66 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. अतिदुर्गम भागातील रुग्णांसाठी 7 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रा. आरोग्य केंद्र साखरपा संगमेश्वर, प्रा. आ. केंद्र भांबेड लांजा व प्रा. आ. केंद्र जैतापूर राजापूरमधील इमारती व कर्मचारी निवासस्थानांसाठी 12.50 कोटी मंजूर दिली आहे. रायपाटण ग्रामीण रुग्णालय, तुळसवडे, धारतळे, केळवली, कारवली, प्रिंदावण, रिंगणे, वाडीलिंबू, जावडे, तळवडे, प्रभानवल्ली व वेरवली बु. येथील प्रा. आ. केंद्र व उपकेंद्रांची दुरुस्ती करणार. आरोग्य मदत कक्षाची निर्मिती आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देणार, दिव्यांगांचे सबलीकरण करण्यासाठी सुविधा केंद्रांची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.(Maharashtra assembly poll)
पाणीपुरवठा व जलसिंचन विभागांतर्गत 7 पाटबंधारे प्रकल्पांकरिता एकूण 2809 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जामदा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या प्रलंबित 1560 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता, अर्जुना प्रकल्पाअंतर्गत सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी रु. 1188 कामांना अनेक वर्षापासून प्रलंबित कामांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे लांजातील 6 तर राजापूरमधील 12 गावे अशी 18 गावातील 6171 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 406 योजनांसाठी 225 कोटी निधी मंजूर, मुचकुंदी पाटबंधारे प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेच्या कामासाठी 47 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. पाणी स्त्रोत बळकटीकरण व जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी विशेषत: शाळा बांधकाम व दुरुस्तीसाठी 8.33 कोटी, अंगणवाडीसाठी 61.60 लक्ष निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राजापूर आयटीआयचे नामकरण प्रा. मधू दंडवते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांचा संकल्प आपण सोडला असून शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द येथे एमआयडीसी उभारण्यास मान्यता मिळाली आहे. जनतेच्या मान्यतेने पर्यावरणपुरक काही प्रकल्प उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तालुक्यात विविध कामांसाठी 132 कोटी रुपयांच्या विकास कामांना निधी मंजूर झाला आहे. शासनामार्फत राबवण्यात येणार्या कृषि व फलोत्पादन योजना व विविध उपक्रमाचा लाभ तळागाळातील शेतकर्यांना मिळावा. विशेषत: काजू उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचेही किरण सामंत यांनी स्पष्ट केले.(Maharashtra assembly poll)
पर्यटन विकासाच्या दृष्टीने या मतदार संघात अनेक स्थळे आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न सुरु आहेत. माचाळ, कशेळी येथील कनकादित्य मंदिरासह, आंबोळगड, यशवंतगड, शिवकालीन गढी, राणी लक्ष्मीबाई कोट येथील ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटनासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.
बंदरांच्या विकासाला प्राधान्य देणार ः किरण सामंत
राजापूर तालुक्यातील महत्त्वाचे बंदर असलेल्या साखरीनाटे मासेमारी बंदराचा विकास गेली अनेक वर्ष रखडला आहे. महायुतीच्या काळात या बंदराचे विकास कामाला प्राधान्य देण्यात आले असून 153 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मच्छीमारांसाठी विविध योजनाही राबवण्यात आल्या आहेत. भविष्यात मासेमारी व प्रवासी बंदरांच्या विकासासाठी अणसुरे, धानीवरे, नाटे, साखरीनाटे, कातळी, डोंगर, नाणार व हर्चे या बंदरांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचेही किरण सामंत यांनी सांगितले.