Published on
:
28 Nov 2024, 11:41 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:41 pm
माळशिरस : माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तमराव जानकर यांनी विजय मिळवून आपली आमदार होण्याची स्वप्नपूर्ती साकारली आहे. अनेक वर्षे विरोधक असलेले विजयसिंह मोहिते-पाटील गट व उत्तमराव जानकर गट यांची युती झाल्याने उत्तमराव जानकर यांनी आपला विजय सार्थ केला. लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील व उत्तम जानकर या पारंपरिक राजकीय विरोधकांची युती झाली. मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीतच खासदार म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार म्हणून उत्तमराव जानकर यांची उमेदवारी फायनल झाली होती. त्यामुळे लोकसभेच्या वेळी उत्तमराव जानकर यांचे आमदारकीचे तिकीट फायनल झाले होते.
माळशिरस तालुक्यातील उत्तमराव जानकर गटाचे कार्यकर्ते व मोहिते-पाटील गटाचे कार्यकर्ते यांना एकत्र आणण्याचे काम मोहिते-पाटील व जानकर यांनी केल्याने त्याचाही फायदा जानकर यांना झाला आहे. माळशिरस तालुक्यात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने व उत्तमराव जानकर धनगर समाजाचे असल्याने त्याचा फायदाही जानकर यांना झाला. मोहिते-पाटील यांनी अनेक समाजातील नेत्यांना जानकर यांच्यासाठी काम करण्यास सांगितले.
या निवडणुकीत तालुक्यात एमआयडीसी, पंढरपूर-फलटण रेल्वेमार्ग व नीरा देवधरचे अपूर्ण काम पूर्ण करणे हे मुद्दे प्रचारात प्रभावी ठरले. तालुक्यातील विविध विकासकामांच्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा माळशिरस तालुक्यात झाली नाही. परंतु मोहिते-पाटील व जानकर यांनी प्रत्येक गावात जाऊन घेतलेल्या कॉर्नर बैठका याही प्रभावी ठरल्या. उत्तमराव जानकर यांच्या विजयासाठी सोशल मीडिया हे माध्यम सर्वात प्रभावी ठरले. या माध्यमातून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी उत्तमराव जानकर यांना आमदार करावे, अशा पोस्ट टाकून मोहिते-पाटील व जानकर यांच्या युतीचा तालुक्याच्या विकासासाठी चांगला फायदा होणार, हे सोशल मीडियातून सांगितल्याने ते माध्यम प्रभावी ठरले.
दरम्यान, माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांचे वर्चस्व आहेच. त्याचबरोबर उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे उत्तमराव जानकर यांना मतदारसंघात असलेल्या धनगर समाज मतदारांनी साथ दिली आहे. त्याचबरोबर धनगर समाजाचे मतविभागणी न होता एकगठ्ठा मते एकत्रीत ठेवण्यात उत्तमराव जानकर हे यशस्वी ठरले आहेत. माळशिरसमधून धनगर समाजाला विधानसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने धनगर समाजाने ती हातून जाऊ न देण्याचा निर्धार केला होता.