Published on
:
24 Nov 2024, 12:00 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:00 am
रत्नागिरी : ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात लोकसभेला सुरुंग लागलेला असतानाच आता विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार बाजी मारली. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. सलग पाचव्यांदा ते विधानसभेत पोहोचत विजयाचा पंचक मारला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा 41 हजार 590 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला. सामंत यांनी मानेंना चौथ्यांदा पराभवाची धूळ चारली. उदय सामंत यांचा विजय झाल्यानंतर महायुतीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.ना. सामंत यांचा विजय झाल्यानंतर ‘येऊन येऊन येणार कोण, उदय सामंत शिवाय आहेच कोण’?, ‘उदय सामंत तुम आगे बढो!, हम तुम्हारे साथ है!’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आपला आनंद साजरा केला. शहरातील सामाजिक न्याय भवन येथे महायुती, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दहा फेर्या झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळावरुन काढता पाय घेतला.
राज्यातील प्रमुख लढतींमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर प्रथमच होणार्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ना. उदय सामंत यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर उबाठा शिवसेना नेमकी काय करणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी उबाठामध्ये प्रवेश करून तिकीट मिळविले.रत्नागिरीत उबाठा पक्ष मजबूत असताना ना. उदय सामंत यांच्यासमोर बाळ माने कडवे आव्हान उभे करतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र राजकारणात कायम मुसंडी मारणार्या उदय सामंत यांनी माने यांना चारीमुंड्या चीत करत विजयाचा पंचक मारला आहे.
शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मताची मोजणी पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. ईव्हीएम मशीनवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या ना. सामंत यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली. पहिल्या फेरीत ना. उदय सामंत यांनी 3701 मते तर बाळासाहेब माने यांना 1568 मते मिळाली. पहिल्या फेरीपासूनच माने हे पिछाडीवर गेले. त्यानंतर दुसर्या फेरीतही सामंत यांनी 3,955 ची आघाडी घेतली. तिसर्या फेरीत 6,083 मतांची ना. सामंत यांनी आघाडी घेतली.
जिल्हा परिषद गटनिहाय मतमोजणी सुरू असताना उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या जि.प. गटात माने यांना आघाडी मिळते का? असा प्रश्न निर्माण झाला असतानाही चौथ्या फेरीत ना. सामंत यांनी 8,984 मतांची आघाडी घेतली. पाचव्या फेरीत ना. सामंत यांनी 10,525 मताची आघाडी घेत दहा हजारांचा टप्पा पार केल्यानंतर ना. सामंत यांचा विजयाचा मार्ग अधिकच सुखकर झाला. दहा हजारांचे लीड कापणे बाळ माने यांना शक्य नसल्याचे सर्वच फेर्यांमधून स्पष्ट झाले होते. सहाव्या फेरीत सामंत यांनी 13,496 चे मताधिक्य घेतले. सातव्या फेरीत 15,769, आठव्या फेरीत 17,480, नवव्या फेरीत 19,936, दहाव्या फेरीत 21,739, अकराव्या फेरीत 22,818, बाराव्या फेरीत 23,831, तेराव्या फेरीत 25,136 चा टप्पा ना. सामंत यांनी पार करताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. भगवा ध्वज हातात घेऊन शिवसैनिक जल्लोष करत होते. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
25 हजारांचा टप्पा पार केल्यानंतर चौदाव्या फेरीत ना. सामंत यांचे मताधिक्य थोडे खाली आले. 25 हजारवरून ते 24,130 वर आले. मात्र पंधराव्या फेरीत त्यांनी मताधिक्यांची कसर भरून काढत ते पुन्हा 25,600 वर पोहोचले. सोळाव्या फेरीत 26,046, सतराव्या फेरीत 26,223, अठराव्या फेरीत 28,719, एकोणीसाव्या फेरीत त्यांनी तीस हजारचा टप्पा पार करत 31,718 चे मताधिक्य मिळविले.विसाव्या फेरीत 30,761, एकवीसाव्या फेरीत 34,366 चे मताधिक्य मिळाले. बाविसाव्या फेरीत सामंत यांनी 35 हजारांचा टप्पा पार करत 36,570 मताचे मताधिक्य मिळविले. तेवीसाव्या फेरीत 38,168 चे मताधिक्य मिळवत सामंत यांनी चाळीस हजारांच्या मताधिक्याकडे वाटचाल सुरु केली होती. चोविसाव्या फेरीत 1, 05,497 मते घेत ना. सामंत यांनी चाळीस हजार मताधिक्याचा टप्पा पार केला. त्यांना 40,052 मतांचे मताधिक्य मिळाले.
पंचविसाव्या फेरीत ना. सामंत यांना एकूण 41,177 चे मताधिक्य मिळाले. 26 व्या फेरीमध्ये शेवटच्या दोन्ही केंद्रांवर आघाडीवर राहिले. शेवटी उदय सामंत यांना 1 लाख 11 हजार 335 मते मिळाली तर बाळ माने यांना 69 हजार 745 मते मिळाली. भरत पवार यांना 1002, कैस नूरमहंमद फणसोपकर यांना 306, कोमल तोडणकर यांना 194, ज्योतीप्रभा पाटील यांना 1061, दिलीप जाधव यांना 280, पंकज तोडणकर 603 मते तर नोटाला 3073 मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी देसाईंच्या कामाचे कौतुक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यावेळी निवडणूक सामान्य निरीक्षक जनक प्रसाद पाठक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन पाहणी केली. रत्नागिरीचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी अंतिम मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उदय सामंत यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. जीवन देसाई यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वच अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांचेही कौतुक केले.
रत्नागिरीतून सर्वाधिक वेळा विजय
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक वेळा उदय सामंत यांनी विजय मिळवला. रत्नागिरीतून पाचवेळा विधानसभेत जाणारे ते पहिलेच आमदार आहेत.
शहरातील पिछाडी भरून काढली
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अकरा जिल्हा परिषद गट आणि रत्नागिरी शहराचा भाग येतो. या अकरापैकी अनेक जि.प. गटात उबाठाचे वर्चस्व असतानाही, उदय सामंत यांना सर्वच जि.प. गटात आघाडी मिळाली. रत्नागिरी शहरामध्ये 2004मध्ये उदय सामंत यांना पहिल्या निवडणुकीत आघाडी मिळाली होती. त्यानंतरच्या तीनही निवडणुकीत शहरामध्ये ते पिछाडीवर राहिले. परंतु वीस वर्षानंतर शहरामध्ये पुन्हा अडीच हजाराची आघाडी उदय सामंत यांनी घेतली.