पिंपरी: आम्हाला ब्लॅकमेल केले जाते, त्रास दिला जातोय, खंडणी वसूल केली जात आहे, अशा तक्रारी उद्योजकांकडून वारंवार येत असतात. मात्र, आता यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. उद्योग असो वा उद्योजकाला त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सोडू नका. त्याच्यावर थेट ‘मोका’ लावा. या लोकांवर ‘मोका’च्या खालची कारवाई करायचीच नाही, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 6) येथे पोलिसांना दिले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालय, महाळुंगे औद्योगिक पोलिस संकुल, तसेच पोलिस विश्रामगृह देहूरोड या इमारतींच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे आण्णा बनसोडे, महेश लांडगे, शंकर जगताप, विजय शिवतारे, सुनील शेळके, शरद सोनवणे, बाबाजी काळे, बापू पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर,अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, स्वप्ना गोरे आदी उपस्थित होते.