सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप माफियांकडून पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे(AI Image)
Published on
:
07 Feb 2025, 4:40 am
Updated on
:
07 Feb 2025, 4:40 am
नाशिक : सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप माफियांकडून पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. स्क्रॅप ठेकेदारासह काही उद्योजकांनी याबाबत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत याप्रकरणाची माहिती घेतली आहे.
तीन महिन्यांपूर्वी स्क्रॅप माफियांकडून उद्योजकांना धमकावण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने, ही टोळी काही काळ शांत झाली होती. आता पुन्हा एकदा ही टोळी औद्योगिक वसाहतीत सक्रीय झाली असून, तीन दिवसांपूर्वीच एका कंपनीच्या प्रवेशद्वारावर स्क्रॅपचा ट्रक या टोळीकडून अडविला होता. तसेच कामगारांना धमकावत उद्योजकांकडेच खंडणी मागितल्याचा आरोप स्क्रॅप ठेकेदाराने पोलिसांना दिलेल्या निवेदनात केला होता. दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून, पोलिसांकडून निमा, आयमा या औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याप्रकरणाची माहिती घेतल्याचे समोर येत आहे. तसेच ज्या उद्योजकांना या टोळीकडून त्रास दिला जात आहे, त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे आव्हानही पोलिसांकडून केले जात आहे.
मंत्री स्तरावरही घेतली दखल
स्क्रॅप माफियांचे कारनामे समोर आल्यानंतर मंत्री स्तरावर देखील याबाबतची दखल घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रातील माफीयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे यंत्रणांना आदेश दिले होते. दरम्यान, काही उद्योजकांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे या माफीयांविरोधात तक्रारी केल्याने, मंत्री स्तरावर देखील हे प्रकरणाची दखल घेतली गेल्याची माहिती समोर येत आहे.