उद्योग
Published on
:
05 Feb 2025, 1:34 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:34 am
मुंबई : उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांना विविध परवान्यांसाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे न झिजवता एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी मैत्री 2 हे आधुनिक पोर्टल उपलब्ध झाले आहे. यापूर्वीच्या मैत्री 1 या पोर्टलमध्ये अनेक आधुनिक बदल केलेल्या मैत्री 2 या पोर्टलचे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आयुक्त देवेंद्र सिंह कुशवाह यांनी या पोर्टलचे सादरीकरण केले.
ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी मैत्रीची सुविधा निर्माण करण्यात आली होती. 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मैत्री 1 मध्ये आधुनिक बदल करून आता 2.0 व्हर्जन आणण्यात आले आहे. यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आणि तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पोर्टलमध्ये 15 विविध विभागांच्या 119 सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधील 100 सेवा संपूर्णपणे एकत्रित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बॉयलर्स, नगर विकास आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला अत्याधुनिक ऑनलाईन सुविधांचा लाभ मिळणार आहे, असे उद्योग विकास आयुक्त कुशवाह यांनी सांगितले.