राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन दोन महिने उलटले आहेत. तरी अद्याप ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी राहायला गेलेले नाहीत. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले होते. एकनाथ शिंदेंनी तिथे कामख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगे पुरली असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यावरुन सध्या उलट-सुलट चर्चा सुरु आहे. संजय राऊतांच्या या विधानावर आता शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे.
संजय गायकवाड यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी वर्षा बंगल्यावरुन केलेल्या आरोपांवर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. एक शिंग तुझ्या नरड्यात खूपसल्याशिवाय राहणार नाही, असे संजय गायकवाड म्हणाले.
“कामाख्या देवी ही अनेक भक्ताचं श्रद्धाच स्थान”
“संजय राऊत अंधश्रद्धेचे बळी असे बोलतात, हे पाहत आहे. कामाख्या देवी ही भारतातल्या अनेक भक्ताचं श्रद्धाच स्थान आहे. त्याच्या प्रति परंपरा त्या ठिकाणी पूजा अर्चना करून त्या ठिकाणी केले जाते. आम्ही गुवहाटीला गेलो, त्यावेळेला जागृत देवस्थान आहे असं सांगितलं. म्हणून आम्ही सर्वांनी आणि एकनाथ शिंदे यांनीही त्या ठिकाणी दर्शन घेतलं. भारतामध्ये आपल्या देवस्थान आहे, त्या देवस्थानासमोर नतमस्तक होणे हा अंधश्रद्धेचा भाग नाही”, असे संजय गायकवाड यांनी म्हटले.
तुझी बडबड बंद होणार नाही
“नेहमी शिंग आणून पुरले. शिंग आणून पुरले, असं बोलतात. माझं राऊतांना सांगणं आहे की एक शिंग मी नक्की आणणार आणि तो तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही”, असा संताप संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.
“हे त्यांच्या टीमला खुपतंय”
“एकनाथ शिंदे हा भाजपचा अपेन्डिस असे बोलतात हे मी पाहिलं. भाजपला टोचतोय कापता येत नाही. अपेन्डिस भाजपला झाला नाही. भाजप एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसेना बाळासाहेबांच्या विचार घेऊन जाणारी शिवसेना आहे. यामुळे अॅपेन्डिक्स याच्या डोळ्यांमध्ये खूपत आहे. संजय राऊत आणि त्यांचे नेत्यांच्या उरावर टिचून जे बोलत होते की 50 पैकी एकही आमदार निवडून येणार नाही तिकडे 60 ते 61 आमदार निवडून आलो आणि भाजप सोबत आहोत. हे त्यांच्या टीमला खुपत आहे”, असेही संजय गायकवाड म्हणाले.
“हा भाजपच्या लोकांवरती अन्याय”
“अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही पुतळा का उभारला नाही. पाच वर्ष भाजपसोबत सत्तेत अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि पंचवीस वर्षे पालिका ताब्यात असून पुतळा का उभारला नाही. लोकांवरती टीका करता येते, मात्र आपल्याला स्वतःला काम करता येत नाही”, असा शब्दात संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
“तिथे शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेचाच पालकमंत्री असायला हवा. माझ्या जिल्ह्यात भाजपचे आमदार आणि एक राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र तिथे राष्ट्रवादीचा पालकमंत्री दिला. हा भाजपच्या लोकांवरती अन्याय आहे. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचा असला हवा”, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले.
“आम्ही आमचं काम चालूच ठेवू”
“गणेश नाईक मंत्री, एकनाथ शिंदे ही मंत्री दोघं आपल्या पक्षाचे काम आणि जनतेचे काम करतात. त्यामुळे त्यांनी जनता दरबार घेतला. वेगळं कारण काही नाही. आम्ही युतीमध्येच आहोत. विरोधक कुठे शिल्लक आहे. आम्हाला नाव ठेवायला 16 आमदार काँग्रेसचे आणि शिवसेनेची हालत सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी किती टीका केली, तर आम्ही आमचं काम चालूच ठेवू”, असेही संजय गायकवाड म्हणाले.