भिंतीवर अडकलेले एक केळे जगातील सर्वात महागडे फळ ठरले आहे. भिंतीवर टेप लावलेले हे केळे 62 लाख डॉलर्स म्हणजेच हिंदुस्थानी रुपयात तब्बल 52.4 कोटी रुपयांना लिलावात विकले गेले आहे. हे केळ ‘द कॉमेडियन’ टोपणनाव असलेले प्रसिद्ध व्हिज्युअल आर्टिस्ट मॉरिझियो कॅटेलन यांची निर्मिती आहे. इतर सहा बोलीदारांना पराभूत करत चिनी क्रिप्टोकरन्सी उद्योजक जस्टिन सन याने या विचित्र कलाकृतीला खरेदी केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, लिलावानंतर हे जगातील सर्वात महाग फळ ठरले आहे. 20 नोव्हेंबरला या केळय़ाचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या कलाकृतीची बोली वेगाने वाढल्याने आयोजकांना आश्चर्य वाटले. क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म ट्रोनचे संस्थापक सन यांनी ही कलाकृती तिच्या अंदाजित किमतीपेक्षा चारपट जास्त किमतीत विकत घेतल्याने ही विचित्र कलाकृती जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.
29 रुपयांचं केळे 52 कोटींना
या केळय़ची गमतीशीर गोष्ट म्हणजे कॅटेलनची कलाकृती ‘कॉमेडियन’ हे एक साधे केळे आहे. हे केळ फक्त 0.35 डॉलर म्हणजेच अवघ्या 29 रुपयांना खरेदी करण्यात आले होते. रिकाम्या भिंतीवर डक्ट टेपने चिकटवले होते. लिलावात ‘कॉमेडियन’ची सुरुवातीची किंमत 8 लाख डॉलर्सवरून 52 लाख डॉलर्स झाली. शेवटी त्याचा 62 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 52.4 कोटी रुपयांमध्ये लिलाव
झाला.
‘कॉमेडियन’ म्हणजे काय?
कॅटलिनने 2019 मध्ये मियामीमधील आर्ट बासेल येथे पहिल्यांदा ‘कॉमेडियन’ची ओळख करून दिली होती. त्यानंतर त्याच्या तीन आवृत्त्या 1.20 आणि 1.50 लाख डॉलरमध्ये विकल्या गेल्या. जे येताच व्हायरल झाले आणि त्याच्या कलेबाबतही वाद सुरू झाले. केळय़ाच्या या कलाकृतीने जगभर दौरा केला आहे. केळे सडल्यावर ते कसे बदलायचे याच्या सूचनादेखील त्यात येतात.