Published on
:
05 Feb 2025, 1:42 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:42 am
सांगली ः विट्याजवळील कार्वे एमआयडीसीतील एमडी ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके मुंबई, गुजरात व दिल्लीला रवाना करण्यात आली आहेत. पथकांकडून एजंटाचा शोध सुरू आहे.
जितेंद्र शरद परमार (वय 41, मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (53, रा. मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय 34, रा. शेणे, ता. वाळवा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यापूर्वी रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख व बलराज कातारी या तिघांना अटक केली होती. पोलिसांनी परजिल्ह्यातही एक पथक तपासकामी रवाना केले आहे.
कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत होते. त्याची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने छापा टाकून 29 कोटी रुपयांचे 14 किलो एमडी जप्त केले. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवण्यात आला. संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. अटक केलेल्या सहाजणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. तेथून त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचे ठरवल्याचेही तपासात समोर आले आहे. सुलेमान शेख, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील, जितेंद्र परमार या चौघांना मुंबई एटीएसने ड्रग्जसह ताब्यात घेतले होते. या टोळीचे एजंट ड्रग्जची विक्री करीत असावेत, असा पोलिसांना संशय असून एजंटांच्या शोधासाठी पोलिसांच्या पथकाने मुंबईत तळ ठोकला आहे, तर दिल्लीतून मशिनरी व वापी, गुजरातमधून केमिकल्स खरेदी करण्यात आल्याने तेथील विक्रेतेही रडारवर आहेत. या प्रकरणात आणखी चार ते पाच जणांची नावे एलसीबीच्या हाती लागली आहेत. तसेच शेजारील राज्यातही छापेमारी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ड्रग्ज निर्मितीसाठी संशयितांनी सारे व्यवहार रोखीतून केले आहेत. मशिनरी, केमिकल्स खरेदी रोख पैशातून करण्यात आली आहे. जितेंद्र परमार याने आर्थिक मदत केल्याचे तपासात समोर आले असले तरी आणखी कोणी पैसे पुरविले, याची माहिती पोलिस घेत आहेत.