Published on
:
02 Feb 2025, 11:42 pm
Updated on
:
02 Feb 2025, 11:42 pm
वॉशिंग्टन : एलियन्स अर्थात परग्रहवासी हा कायमच माणसाच्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. पृथ्वीप्रमाणेच ब्रह्मांडातील अन्य ग्रहांवर जीवसृष्टी असेल का? असलीच तर ते जीव मानवासारखे असतील का, ते आपल्याला शोधत इथे येतील का, असे अनेक प्रश्न साहित्यिकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच पडत असतात. त्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी संशोधन केले जाते. नवनव्या संशोधनातून नवनवी माहिती हाती येत असते. आता अमेरिकेतल्या ‘नासा’ या संस्थेने केलेल्या नव्या संशोधनातून अशी माहिती पुढे आली आहे की ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. एलियन्स पृथ्वीवरच असून, ते दुसरे-तिसरे कोणी नसून मानवच आहेत, असा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे.
24 सप्टेंबर 2023 रोजी बेन्नू लघुग्रहावरून परतलेल्या ‘नासा’च्या ओसायरिस रेक्स यानाच्या सँपल रिसर्चवरून असे कळले की, त्यात जीवनासाठी आवश्यक घटक आहेत. त्यात डीएनए आणि आरएनएचे 5 न्यूक्लिओबेसेस आणि प्रोटीनमध्ये मिळणार्या 20 अमिनो अॅसिडस्पैकी 14 अॅसिडस् सापडली आहेत. पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी एखाद्या अॅस्टरॉइडवरून आली आहे का, असा सवाल यातून उपस्थित झाला आहे. म्हणजे माणूसचा असा एलियन आहे की, ज्याचं मूलस्थान पृथ्वी नाही, तर तो बाहेरून आला असावा, असे यातून प्रतिबिंबित होत आहे.
अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. ते छोट्या खडकांप्रमाणे असतात आणि सूर्याभोवती फिरत असतात. त्यांना वातावरण नसते. त्यांचा आकार 1000 किलोमीटर्सपर्यंत असू शकतो. कधी ना कधी हे लघुग्रह पृथ्वीवर पडत असतात. ‘नासा’च्या यानाने जो मातीचा नमुना आणला आहे, तो जगासाठी खूप उपयुक्त आहे. 1650 फीट रुंदीच्या लघुग्रहावरचे नमुने ‘नासा’च्या या यानाने पाठवले. याचा पहिला अहवाल जाहीर झाला आहे. या संशोधनावरचा लेख ‘नासा’चे अॅस्ट्रोबायॉलॉजिस्ट डॅनियल जेल्विन यांनी नेचर अॅस्ट्रॉनॉमीमध्ये लिहिला आहे.