विविध कारणास्तव वर्षानुवर्षे रखडलेले एसआरएचे चार प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार आहे. या चार प्रकल्पाचे प्रस्ताव म्हाडाकडून पुढील कार्यवाहीसाठी एसआरएला पाठवण्यात आले आहेत. एसआरएचे रखडलेले हे प्रकल्प म्हाडाच्या जमिनीवर असून या निर्णयामुळे वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 550 रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
रहिवाशांचा विरोध, कायदेशीर पेच किंवा आर्थिक चणचण अशा विविध कारणांमुळे काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतात. त्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेले 17 एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार आहे. यात कुर्ला व चेंबूर येथील प्रत्येकी एक आणि जोगेश्वरी मजास येथील दोन प्रकल्पांचा समावेश आहे.
जोगेश्वरी, कुर्ला आणि चेंबूर येथील 550 रहिवाशांना दिलासा
अशी असणार प्रक्रिया
सध्या या चार प्रकल्पासाठी हेतू पत्र (letter of intent) म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एसआरएला पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर म्हाडातर्फे निविदा प्रक्रिया राबवून आर्किटेक्ट, विकासकाची नेमणूक करण्यात येईल आणि प्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे.
एसआरएच्या नियमानुसार घरे मिळणार
सदरचे भूखंड रिक्त करण्याची जबाबदारी एसआरएची असणार आहे तर परिशिष्ट-2 तयार करून पात्रता निश्चित करण्याचे काम म्हाडाच करणार आहे. रहिवाशांना एसआरएच्या नियमानुसार घरे दिली जातील, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱयाने दिली.