मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना सुभाष देशमुख, मनीष देशमुख, रोहन देशमुख.File Photo
Published on
:
28 Nov 2024, 12:25 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:25 am
सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आ. सुभाष देशमुख यांनी बुधवारी (दि. 27) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी निवडून आल्याबद्दल दोघांनीही एकमेकांचा सत्कार केला. यावेळी मनीष देशमुख, रोहन देशमुख उपस्थित होते.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. याठिकाणहून भाजपचे आ. सुभाष देशमुख यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आ. देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे.
राज्यात 2014 मध्ये महायुतीचे सरकार आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात त्यांनी आ. देशमुख यांच्याकडे सहकार या महत्त्वाच्या मंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी आ. सुभाष देशमुख यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यांच्या सहकारमंत्र्यांच्या काळातच बाजार समितीमध्ये शेतकर्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बाजार समितीमध्ये थेट शेतकर्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय रद्द केला होता. त्यानंतर आता 2024 मध्ये राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे. फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात आ. सुभाष देशमुख यांचा समावेश होणार का याची सोलापूर जिल्ह्याला उत्सुकता आहे.
आ. देशमुख यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर शेतकर्यांसाठी महत्त्वाचा असणारा बाजार समितीमधील मतदानाचा अधिकाराचा कायदा पुन्हा लागू होणार का याबाबत राज्यातील शेतकर्यांमध्ये उत्सुकता आहे. पुढील काही महिन्यात राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात सोलापूर, बार्शी या जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांच्या निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना मतदानाचा अधिकार मिळाला अशी राज्यातील शेतकर्यांची अपेक्षा आहे.