शासकीय, कृषी योजना कार्टून व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांत जनजागृती:कृषी सहायक अमोल चौकडे कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित

2 hours ago 2
अनेक शासकीय कर्मचारी नियमाच्या बाहेर न जाता पारंपरिक पद्धतीने काम करतात. मात्र चांदूर रेल्वे तालुका कृषी कार्यालय अंतर्गत कृषी सहायक अमोल चौकडे यांनी शासकीय योजना व कृषी विषयक माहिती पारंपरिक पद्धती ऐवजी कार्टून व्हिडिओद्वारा मनोरंजक पद्धतीने गाव खेड्यांपर्यंत पोहचवत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना नुकतेच नाशिक येथील भव्य कृषी प्रदर्षनीमध्ये कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन नाशिकद्वारे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरची कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यावर्षी शासकीय गटातून अमोल चौकडे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील रहिवासी असलेले अमोल चौकडे हे चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी, किरजवळा, वाई, बोथ आणि खंबाळा या कार्यक्षेत्रात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहेत. स्वतः प्रयोगशील शेतकरी असल्याने केवळ कार्यक्षेत्र पुरते मर्यादित न राहता चांदूर रेल्वेसह धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तालुका व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी डिजिटली कनेक्ट आहे. ते सोयाबीन, हरभरा व तूर या पिकांमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा सुधारित पट्टा पेर पेरणी पद्धती कशी फायदेशीर आहे, हे प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना पटवून देतात. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यात व जिल्ह्यामध्ये सुधारित पट्टापेर पेरणीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.चौकडे यांच्या पुरस्कारबाबत तालुका कृषी अधिकारी ढाकरे, मंडळ कृषी अधिकारी आडे, मांजरखेडच्या सरपंच पल्लवी शैलेश देशमुख, पाताळेश्र्वर व गुप्तेश्वर देवस्थान अध्यक्ष नरेंद्रपंत देशमुख, दिलीप गुल्हाने, अमोल देशमुख, प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल देशमुख, मुंसिफ पठाण, प्रा.डॉ. मेघराज मेश्राम, श्रीनाथ वानखडे आदींसह गावकऱ्यांनी त्यांच्या यशाबाबत अभिनंदनाचा वर्षाव केला. स्वतः अगोदर शेतकरी म्हणून प्रयोग करून बघायचा, नंतर यश आल्यावर इतरांना सांगायचे याच तत्त्वावर चौकडे यांनी आपल्या कामाची पद्धत अवलंबली आहे. शेतकऱ्यांपासून ते ग्रामसेवक, तलाठी व इतर ग्रामीण भागातील निगडित कर्मचारी व अधिकाऱ्यांना रामेती व इतर प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article