Published on
:
28 Nov 2024, 12:25 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:25 am
सावंतवाडी ः येथील सर्पमित्र नाविद हेरेकर यांनी दोन बाल सर्पमित्रांच्या सहकार्याने चार दिवसांत 4 अजगरांसह एक नाग, एक धामण, एक मांडूल अशा सात सर्पांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. यामध्ये बाल सर्पमित्र नाविद हेरेकर यांचा मुलगा कबीर हेरेकर याचा समावेश आहे. नाविद यांनी मुलाला आणि पत्नी नबिला हेरेकर यांनाही साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
शनिवारी रात्री सावंतवाडी शहरातील बांदा नाका परिसरात भरवस्तीतील दहा फुटी महाकाय अजगराला नाविद यांनी पीयूष निर्गुण याच्या सहकार्याने या अजगराला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले होते. दुसर्याच दिवशी रविवारी एक नाग, एक धामण, एक मांडूल अशा तीन सर्पांना पकडून त्यांना जीवदान दिले.
तिसर्या दिवशी सोमवारी रात्री खासकीलवाडा येथेही भरवस्तीत आठ फुटी अजगरालाही नाविद यांनी पियुष आणि कबीर यांच्या सहकार्याने पकडून जीवदान देत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चौथ्या दिवशी मंगळवारी रात्रीही सावंतवाडी शहरातील पोलिस लाईन परिसरात भरवस्तीतील सात फुटी अजगराला नाविद आणि कबीर यांनी पकडून जीवदान दिले. सर्पमित्र नाविद यांनी यापूर्वीही सावंतवाडी परिसरातील अनेक अजगरांसह सापांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.