Published on
:
28 Nov 2024, 12:15 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:15 am
सातारा : पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला मंगळवारी रात्री आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचार्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग आटोक्यात आणली.
दुकानात नेहमीप्रमाणे दुकानातील कर्मचारी कामात व्यस्त असताना दुकानाच्या कोपर्यात सिलिंगला असणार्या वातानुकूलीत यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किट झाले व तेथून धूर येऊ लागला. कर्मचार्यांनी तातडीने तेथील वीज पुरवठा बंद केला. मात्र, तोपर्यंत आग पसरली होती. त्यावेळी पोवई नाका येथे सुहास पवार आणि समाधान निकम नावाचे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. त्यांनी तातडीने तेथील कर्मचार्यांना बाहेर काढून पाण्याने आग आटोक्यात आणली. तसेच तेथील चपलांचे आणि बुटांचे बॉक्स सुद्धा तातडीने हलवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी पोवई नाक्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेनंतर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.