विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करत आहे. त्यातील अपात्र असणाऱ्या बहिणींना योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम देणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिलांना एसटी बस प्रवासात महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 50 टक्के सवलतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात 24 जानेवारीपासून जवळपास 15 टक्क्यांनी एसटी प्रवास महागला आहे. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांची उत्तरं दिली. परिवहन मंत्र्यांनी 50 टक्के सवलतीबाबत काय म्हटलं? ही योजना सुरु राहणार की नाही? हे जाणून घेऊयात.
परिवहन मंत्री काय म्हणाले?
“राज्याचे प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या माध्यमातून परिवहन विभागाचे प्रमुख आणि एडीजी यांच्यात प्राधिनिकरणाची बैठक झाली. त्या बैठकीत एसटीच्या रखडलेल्या भाडेवाढीबाबत निर्णय घेतला. त्यानुसार बैठकीत 14.95 टक्क्यांनी एसटी तिकीट दरात भाडेवाढ केली. तसेच 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. मात्र याबाबत माझ्याकडे अधिकृतरित्या याबाबतची फाईल माझ्याकडे आलेली नाही, मात्र ती येईल असं मला वाटतंय “, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
“एसटीची भाडेवाढ दरवर्षी करणं गरजेचं आहे. प्रवाशांना सुखसोयी देत असताना डीझेल-सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. एसटी महामंडळाची परिस्थितीत बघितली तर दरदिवशी सुमारे 3 तर दर महिन्याला 90 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे”, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
महिला सन्मान योजनेबाबत परिवहन मंत्री म्हणाले…
“आमच्या सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरु केल्या आहेत, त्यामध्ये कुठेही कटोती होणार नाही. सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सूट ही कायम राहिल. या सवलतीमुळेच एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत कटोती होणार नाही”, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं.
प्रवाशांकडून नाराजी, मागणी काय?
एसटी तिकीट दरात वाढ झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांना आता खिसा हलका करावा लागणार आहे.एका बाजूला दरवाढ केली जात आहे, मात्र सुविधांच्या नावाने बोंब असल्याचं प्रवाशांकडून म्हटलं जात आहे. भाडेवाढीनुसार प्रवाशांना सुविधा द्यावी. तसेच सुस्थितीत असलेल्या बसेस सोडव्यात, अशी मागणीही प्रवाशांकडून या निमित्ताने केली जात आहे.