Bhandara:- भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी विभाग, जवाहर नगर (ठाणा) येथे आज सकाळी ९:४५ वाजता स्फोट (Explosion) झाला. या दुर्घटनेत छत कोसळून मोठी हानी झाली आहे. या घटनेत १३ जण मलब्याखाली अडकले होते, त्यापैकी ७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
घटनेत १३ जण मलब्याखाली अडकले;
मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात ४ जण मृत्युमुखी पडले असून ६ जखमींवर लक्ष्य हॉस्पिटल, भंडारा येथे उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये चंद्रशेखर गोस्वामी (५९), मनोज मेश्राम (५५), अजय नागदेवे (५१) आणि अंकित बारई (२०) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये एन. पी. वंजारी (५५), संजय राऊत (५१), राजेश बडवाईक (३३), सुनील कुमार यादव (२४) आणि जयदीप बॅनर्जी (४२) यांचा समावेश आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यासाठी SDRF, NDRF आणि नागपूर महानगरपालिकेच्या चमूंना पाचारण करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाने घटनास्थळी तत्काळ कार्यवाही केली. नगर परिषद भंडारा, सनफ्लॅग कंपनी, वरठी आणि आयुध निर्माणीचे अग्निशमन वाहन मदतकार्य करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून जिल्हा रुग्णालयात बेड राखीव ठेवले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तपास सुरू आहे.