Published on
:
31 Jan 2025, 12:06 am
Updated on
:
31 Jan 2025, 12:06 am
सातारा : सातार्यातील छ. शिवाजी महाराज संग्रहालयात गेल्या सात महिन्यांपासून विसावली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे आज शुक्रवार, दि. 31 रोजी दुपारनंतर नागपूरला रवाना होणार आहे. दि. 1 फेब्रुवारी रोजी ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात 8 महिन्यांसाठी विसावा घेणार आहेत. वाघनखांची उणीव भरुन काढण्यासाठी संग्रहालयातील ‘त्या’ दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा, सातार्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा अथवा शिवकालीन एकधारी वाघनखं ठेवण्याबाबत पुरातत्त्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे.
लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे सातार्यातील संग्रहालयात दि. 19 जुलै 2024 रोजी दाखल झाली. दि. 20 जुलै पासून ही वाघनखे तसेच शिवशस्त्र शौर्यगाथा हे शस्त्र प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत राज्यभरातील 4 लाख 25 हजार नागरिकांनी या संग्रहालयाला भेट दिली. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या ऐतिहासिक वाघनखांचा सातार्यातील मुक्काम दि. 31 जानेवारीला पूर्ण होत आहे. दि. 1 फेब्रुवारीला ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाकडे मार्गस्थ केली जाणार आहे. दि. 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत ही वाघनखे नागपूर व त्यानंतर दि. 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.
आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या हाताचा पंजा संग्रहालयात आहे. हातावर चंदनाचा लेप लावून तो ठसा कागदावर उमटवण्यात आला आहे. इतिहास तज्ज्ञ. ग. ह. खरे यांनी हा ठसा त्यावरील माहितीचे वाचन केले होते. म्हसवड येथील राजमाने घराण्याकडून हा ठसा 50 वर्षांपूर्वी संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आला. याशिवाय सातार्याचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांचा बिचवा व शिवकालीन एकधारी वाघनख अशा ऐतिहासिक वस्तुंचे येथे संवर्धन करण्यात आले आहे. वाघनखांच्या दालनात यापैकी एक वस्तू ठेवण्याबाबात पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे, अशी माहिती संग्रहालयाचेअभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.