कोल्हापूर : कोल्हापुरात रसिकांसाठी अनोखी पर्वणी ठरणार्या सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या करवीरनगरीतील पहिल्या वहिल्या लाईव्ह इन कॉन्सर्टला आता एकच दिवस उरला आहे. अजय-अतुल हे महाराष्ट्राचे लाडके संगीतकार कोल्हापुरात दाखल झाले. या शोचे स्पॉन्सर्स आणि निवडक चाहत्यांसाठी आयोजित मीट अँड ग्रीट कार्यक्रमात त्यांनी कोल्हापूरकर रसिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याला या, आपण सगळे मिळून जल्लोष करूया असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पीएनजी ज्वेलर्स असून सहप्रायोजक चितळे एक्स्प्रेस आहेत. माध्यम प्रायोजक दैनिक ‘पुढारी’, टोमॅटो एफएम रेडिओ पार्टनर, तर चॅनेल पार्टनर ‘पुढारी न्यूज’ आहेत. यावेळी पीएनजीचे संचालक तेजस गाडगीळ, मॅनेजर अभिजित माने, मार्केटिंग मॅनेजर प्रशांत आरबळे, चितळे एक्स्प्रेसचे दिगंबर मोहिते, दैनिक ‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, आयोजक दत्ता बाबर, दीपक सगरे, दुर्गामाता एंटरटेन्मेंटचे योगेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या कॉन्सर्टचे सूत्रसंचालन ‘चंद्रमुखी’फेम प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर करणार आहे.
अजय म्हणाले, कोल्हापूरशी आमचा वेगळाच कनेक्ट आहे. जेव्हापासून हा कार्यक्रम निश्चित झाला, तेव्हापासून आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. कारण, पहिल्यांदाच करवीरनगरीत भव्य स्टेजवर परफॉर्म करत आहोत. मराठी गाण्यांचा एवढा मोठा लाईव्ह कॉन्सर्ट होत आहे, ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. आमच्यासोबत या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग बना, आपण सगळे मिळून जल्लोष करूया, असेही ते म्हणाले. आम्ही गाणी सादर करतो, तेव्हा लोक त्यांना त्यांच्या आयुष्यातील त्या विशिष्ट काळाशी जोडले जातात. त्या आठवणींमध्ये रमून जातात. ‘अगंबाई अरेच्चा’पासून सुरू झालेला हा प्रवास पाहता आज एक संपूर्ण पिढी आमच्या गाण्यांवर मोठी झाली आहे, अशी भावना अजय-अतुल यांनी व्यक्त केली.
कोल्हापुरात शो निश्चित झाल्यापासून आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. संगीतकार जेव्हा स्वतः गातो, तेव्हा त्याला गाण्यात जे हवं ते सगळं उतरवता येतं. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व इलाईराजा यांच्या समोर गाण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी सर्वात मोठे भाग्य आहे, असे अजय यांनी सांगितले. माझ्या वडिलांना ‘माऊली माऊली’ हे गाणं खूप आवडायचं. ते आजारी होते तेव्हाही या गाण्याच्या शेवटच्या गजराच्या चालीवर ताल धरला आणि जन्माचं सार्थक झालं असं वाटलं, असे अतुल यांनी सांगितले.
पारंपरिक संगिताला आधुनिक साज चढवण्याच्या त्यांच्या प्रयोगांबाबत विचारले असता ते म्हणाले, गाणं प्रवाही राहिलं की ते जिवंत राहतं. त्यामुळे पारंपरिक गाण्यांमध्ये इनोव्हेशन करत गेलो आणि लोकांना ते आवडलं. आमच्या ‘विश्व विनायक’ या पहिल्या अल्बमपासून सुरू झालेल्या संगीतमय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. इनोव्हेशन करत असतानाही आम्ही एकदाही उच्चार चुकू दिला नाही.
दरम्यान, महासैनिक दरबार ग्राऊंडवर भव्य स्टेज आणि बैठक व्यवस्थेची जोरदार तयारी सुरू आहे. या भव्य स्थळी तब्बल 15 हजार प्रेक्षकांसाठी या शोचे आयोजन केले असून, प्रशस्त पार्किंगसह मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना पहिल्यांदाच पुणे, मुंबईच्या तोडीच्या लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव मिळणार आहे.
नव्या वर्षातील सर्वात मोठा सांगितिक सोहळा एक दिवसावर आला असताना आयोजकांनी रसिकांसाठी खास ऑफर जारी केली. शनिवारी आणि रविवारी ग्रुप बुकिंग करणार्यांना भरघोस सवलत देण्यात येणार आहे. बुकिंगबाबत अधिक माहितीसाठी 7517513377, 8390876037 या क्रमांकांवर संपर्क साधा.