ओन्ली डेव्हलपमेंट... नो पॉलिटिक्स!pudhari photo
Published on
:
04 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:40 am
ना टीका-टिप्पणी, ना टोले-प्रतिटोले की ना आरोप-प्रत्यारोप. अगदी साधे चिमटेसुद्धा नाहीत. एकमेकांशी सहमत होत एकमेकांना ‘रिस्पेक्ट’ देत फक्त आणि फक्त जिल्ह्याच्या विकासावर चर्चा झाली. हे चित्र दिसलं सोमवारच्या जिल्हा नियोजन समिती सभेत. ‘ओन्ली डेव्हलपमेंट... नो पोलिटीक्स’ अशी प्रतिक्रिया सहजपणे ही सभा संपताच ऐकायला मिळाली. अर्थात सर्वच लोकप्रतिनिधी पॉवर पार्टीचे. प्रशासकीय राजवट असलेल्या जिल्हा परिषदेच्या कारभाराचे मात्र या सभेत ‘पोस्टमार्टेम’ झाले. अधिकार्यांना धारेवर धरले गेले. पालकमंत्री नितेश राणे यांनी मात्र यापुढे आर्थिक बेशिस्त अजिबात चालणार नाही, सोमवारच्या दांड्या खपवून घेणार नाही, असे स्पष्ट बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला.
ही सभा तशी विशेषच होती. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा प्रस्थापित झाली तरी पालकमंत्री बदलले आहेत. वैभव नाईक यांच्याऐवजी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार निलेश राणे सभागृहात होते. स्वतः खासदार नारायण राणे हेही उपस्थित होते. सत्ताधारी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि भाजपाचे विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे हेही विराजमान होते. अलिकडे जिल्हा नियोजन समिती सदस्य बरखास्त करण्यात आले होते. परिणामी, विरोधक कुणीच नव्हते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दीड महिन्यात प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकांचा आणि त्यातील निर्णयांचा जो सपाटा लावला त्या पार्श्वभूमीवर या नियोजन समितीच्या बैठकीची उत्सुकता सर्वांनाच होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तर खूप गर्दी केली होती. भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही सभागृह परिसरात वर्दळ मोठी होती. बाहेर मोठा पोलिस बंदोबस्तही होता. नियोजन विभागाचे कर्मचारी सभागृहात प्रवेश देताना नावे नोंदणी करत होते. तपासूनच आत प्रवेश दिला जात होता. देवगडचा कार्यक्रम आटोपून पालकमंत्री नितेश राणे वेळेत सभागृहात आले. मग खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे येताच सभा सुरू झाली. अधिकार्यांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरले होते. परंतु अनेक अधिकारी ‘होमवर्क’ करून आले नव्हते हे नंतर स्पष्ट झाले.
आमदार नीलेश राणे ‘होमवर्क’ करून आले होते
आमदार नीलेश राणे यांनी यापूर्वी खासदार म्हणून काम केले होते. या सभेला येण्यापूर्वी त्यांनी पुरेसे होमवर्क केलेले दिसले. अधिकार्यांनी जेव्हा ‘प्रेझेंटेशन’ सुरू केले तेव्हा एकेक प्रश्न विचारायला आमदार नीलेश राणे यांनी सुरुवात केली. अनेक अधिकार्यांना उत्तरही देता येईना. विशेषतः जिल्हा परिषदेच्या कारभाराचे पोस्टमार्टेम करून टाकले. मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांना तर ‘तुम्ही कार्यालयात देशाच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध रहा’ अशी सूचना करतानाच ‘तुम्ही म्हणजे देव नाही’ असे स्पष्ट सांगितले. जिल्हा परिषदेमध्ये भेटायला आलेल्या लोकांच्या तोंडावर अधिकार्यांकडून कागद फेकले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
आमदार नीलेश राणे यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढत अधिकार्यांना फैलावर घेतले. जलजीवन मिशनमध्ये तर खूपच भ्रष्टाचार आहे. न झालेल्या कामांची बिले काढलीत असा आरोप केला. जिल्हा परिषदेकडून वारंवार अखर्चित राहणार्या निधीवर त्यांनी बोट ठेवले. 180 कोटींपैकी आता कुठे 70 कोटी खर्च झालेत, उरलेले खर्च कसे होणार? असा सवाल उपस्थित केला. वार्षिक विकास आराखड्यातील निधी अखर्चित राहिला तर पुढील वर्षीच्या आराखड्यावर त्याचा परिणाम होतो, याकडेही आ. नीलेश राणे यांनी लक्ष वेधले.
खासदार नारायण राणे मार्गदर्शकाच्या भूमिकेत
सुरुवातीपासूनच खासदार नारायण राणे यांनी सभागृहाला मार्गदर्शन करण्याची भूमिका निभावली. काहीवेळा अधिकार्यांना कारवाईचे इशारेही ते देत होते. अधिकार्यांना धारेवरही धरत होते. जिल्हा नियोजन समितीकडून जो खर्च होतो, त्यातून लोकांचे जीवनमान किती उंचावले, याचा अभ्यास करता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोमवारची अधिकार्यांना सुट्टी नसते, याची आठवणही करून दिली. दरवर्षीचा विकास आराखडा कॅरी फॉरवर्ड करू नका, लोकांच्या हिताच्या योजना तयार करून निधीची मागणी करा, अशी सूचनाही त्यांनी अधिकार्यांना केली.
पालकमंत्र्यांकडून अंमलबजावणीचे आदेश
खासदार नारायण राणे आणि आमदार नीलेश राणे ज्या सूचना मांडत होते त्या मात्र पालकमंत्री नितेश राणे शांतपणे नोंद करून घेत होते आणि त्यासंबंधी निर्णय घेऊन अधिकार्यांना अंमलबजावणीचे आदेश देत होते. आदर्श अधिकारी पुरस्कार देण्याची सूचना असो की 124 कोटींच्या नॉन प्लॅन निधीचा आराखडा तयार करण्याची सूचना असो, की कृषी मेळावा का घेतला जात नाही? हा सवाल असो, प्रत्येक प्रश्नावर आणि सूचनेवर पालकमंत्री अधिकार्यांना अंमलबजावणीचे निर्देश देत होते. अगदी आमदार दीपक केसरकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या विषयांची दखलही पालकमंत्र्यांनी गांभीर्याने घेतली.
हो... मिले सूर मेरा तुम्हारा... असेच वातावरण व्यासपीठावरील लोकप्रतिनिधींमध्ये होते. आमदार दीपक केसरकर काहीसे उशिरा आले. ते एका बाजूला खुर्चीवर बसले. काही वेळाने जेव्हा आमदार निलेश राणे यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तात्काळ आपली खुर्ची केसरकर यांना देवून ते बाजूला बसले. मग आमदार केसरकर प्रत्येकाला नमस्कार करत होते. सर्वचजण एकमेकांशी सलोख्याने बोलत होते. समन्वय चांगला दिसत होता. प्रत्येक मुद्द्यावरही सहमती दिसत होती.