Published on
:
04 Feb 2025, 3:29 am
Updated on
:
04 Feb 2025, 3:29 am
नाशिक : आजवर सर्वच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहिले आहेत. फडणवीसही राहिले आहेत. त्यामुळे तो मुद्दा नाही. लिंबू- मिरची, गंडा- दोरा हे सर्व सकाळच्या भोंग्यालाच माहिती आहे, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १३ फेब्रुवारीच्या आभार दौरा यात्रेच्या निमित्ताने मंत्री भुसे यांनी शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? याचं उत्तर काळ्या जादूवाल्याने द्यावे. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. आजवर सर्वच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहिले आहेत. फडणवीसही राहिले आहेत, त्यामुळे तो मुद्दा नाही. लिंबू-मिरची, गंडा-दोरे हे सर्व सकाळच्या भोंग्याला माहिती आहे, असे म्हणत भुसे यांनी राऊतांवर टीकास्त्र डागले. आज आम्ही आभार दौऱ्याच्या नियोजन संदर्भात एकत्र आलो आहेत. जे आरोप करतात त्याचे नावही नको, असेही भुसे म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर आभार दौरा यात्रा सुरू केली आहे. येत्या १३ फेब्रुवारी ही आभार दौरा यात्रा नाशिकमध्ये येत आहे. या दिवशी शिंदे यांची सभादेखील होणार असल्याचे भुसे म्हणाले. शिवसैनिक नोंदणी सप्ताहाची सुरुवात झाली आहे. ९ तारखेला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा वाढदिवस साजरा होणार असल्याचे भुसे म्हणाले. पक्षात कोणतीही गटबाजी नाही, सर्व एकत्र आहोत आणि एकजुटीने काम करत आहोत, असा दावाही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार दौरा यात्रा नाशिकमध्ये येत्या १३ फेब्रुवारी येत आहे. या दिवशी शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीरसभा देखील होणार असल्याचेही यावेळी मंत्री भुसे यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे यात काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे.