'पतसंस्था चळवळीच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य'Pudhari
Published on
:
04 Feb 2025, 5:40 am
Updated on
:
04 Feb 2025, 5:40 am
पुणे: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्ताने राज्यातील पतसंस्था चळवळीस भेडसावणार्या प्रश्नांची यादी दिल्यास त्यातील प्रश्न सोडवणुकीस प्राधान्य देऊन निश्चितपणे त्यांना गिफ्ट दिले जाईल, अशी ग्वाही सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
सहकार चळवळीची चांगली बाजू समाजासमोर आणण्यासाठी आयुक्तालयात स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल. चांगल्या सहकारी संस्थांची पुस्तिका, स्मरणिका प्रकाशन करून पतसंस्था चळवळीच्या पाठीशी सहकार विभाग खंबीरपणे उभा राहून सर्वतोपरी मदत करेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने काढलेल्या सहकारमहर्षी स्व. धनंजयराव गाडगीळ सहकार पुस्तकदिंडीचे सोमवारी (दि.3) येथील सहकार आयुक्तालयात दुपारी साडेबारा वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. या वेळी दीपक तावरे यांनी सहकार पुस्तकदिंडीचे स्वागत केले.
या वेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व संचालक मंडळ, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, सहकारचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक राजेश सुरवसे, आयुक्तालयातील उपनिबंधक (नागरी बँका) आनंद कटके, उपनिबंधक (पतसंस्था) मिलिंद सोबले, पुणे विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत (शहर), प्रकाश जगताप (ग्रामीण), उपनिबंधक बाळासाहेब तावरे, अन्य अधिकारी व कर्मचारीवर्ग आणि विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यानंतर पुस्तकदिंडी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दाखल झाली. या वेळी राज्याचे क्रीडामंत्री व बँकेचे संचालक दत्तात्रय भरणे यांच्यासह बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक रमेश थोरात, प्रवीण शिंदे, सुरेश घुले व अन्य संचालक, अधिकारी आणि कर्मचार्यांनी पुस्तकदिंडीचे स्वागत केले. त्यानंतर बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तावरे बोलत होते.
चुकीच्या पतसंस्थांचे समर्थन करणार नाही : काकासाहेब कोयटे
पतसंस्था फेडरेशनला काही बंधने मान्य असून, आमच्यातील काही पतसंस्था चुकीची कामे करत असतील, तर त्यांचे समर्थन आम्ही अजिबात करणार नसल्याचे नमूद करत या वेळी बोलताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे म्हणाले, चळवळीतील अपप्रवृत्तींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करत असताना केवळ उत्सवापुरते साजरे न करता पतसंस्था चळवळीच्या प्रश्नांची कायमस्वरूपी तोडगा सहकार विभागाने काढून आम्हाला एक गिफ्ट द्यावे आणि आमचा हा बालहट्ट पुरवावा.
दरम्यान, शिर्डी येथे पतसंस्था फेडरेशनचे 8 फेब्रुवारीस 125 प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होणार आहे, तर 9 तारखेस सहकार परिषद होत आहे. फेडरेशनच्या वतीने वर्षभरात सहकार पतसंस्था चळवळीची निबंध, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा आणि खास महिलांकरिता सहकारसम्राज्ञी स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.