महाकुंभ चेंगराचेंगरी ! "चूक नव्हती... तर आकडे का दाबले..."; अखिलेश यांचा सरकारला सवालFile Photo
Published on
:
04 Feb 2025, 7:22 am
Updated on
:
04 Feb 2025, 7:22 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: Akhilesh Yadav | अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि.४) चौथा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरी प्रकरणावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच, समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेत महाकुंभ अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशातील योगी सरकारला महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणावरून अधिवेशात सवाल केला आहे.
राज्यसभेत खासदारांनी याच मुद्द्यावर केला होता सभात्याग
सोमवारी (दि.३) लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची तसेच आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली. दरम्यान राज्यसभेत देखील या मुद्यावरून गदारोळ निर्माण झाला. राज्यसभेतील खासदारांची मागणी पूर्ण न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच, समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर भाष्य केले.
डबल इंजिन सरकारने महाकुंभात मृत्युमुखींचे आकडे द्यावे
लोकसभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, "डबल इंजिन सरकारने अपघातग्रस्तांचे आकडे लपवले आहेत. त्यांनी आकडे का दडवले आणि लपवले?, याचे उत्तर द्यावे". ते म्हणाले, 'सरकार सातत्याने अर्थसंकल्पाचे आकडे देत आहे, परंतु त्यांनी महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांचे आकडेही द्यावेत. महाकुंभाच्या व्यवस्थेबाबत स्पष्टीकरण मिळविण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी अशी माझी मागणी आहे.
आकडे का दाबले, पुसले गेले...; अखिलेश यादव यांचा सवाल
महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेला आणि सापडलेल्यांची केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीची उपलब्धता संसदेत मांडली पाहिजे. महाकुंभ दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा करावी. आम्ही डबल इंजिन सरकारला विचारतो की, "जर चूक नव्हती तर आकडे का दाबले गेले, लपवले गेले आणि पुसले गेले?"