लातूर (Latur) :- काही नाही… तुम्हाला भरपूर वेळ असेल किंवा इतरत्र कुठे बसण्यासाठी जागा नसेल… किंवा ‘विरंगुळा’ करण्यासाठी ठिकाण नसेल तर तुम्ही बिनधास्त लातूर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागात (Department of Education) जाऊन बसू शकता… होय इतकं स्वातंत्र्य या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही लोकांना दिले गेले आहे.
समाजसेवेवर आता काही लोकांनी घेतला आक्षेप
अर्थात आस्थापनेवरील अधिकृत कर्मचारी नसतानाही या विभागाच्या खुर्चीत आरामशीर रेलून लोकांची कामे करण्याची समाजसेवा ही जगावेगळी ‘समाजसेवा’ इथेच पाहायला मिळेल. अशा समाजसेवेवर आता काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी या आक्षेपाचे कसे निरसन करतात, याकडे लक्ष लागले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून नव्हे तर वर्षांपासून काही कर्मचारी तळ ठोकून आहेत. अर्थात हे कर्मचारी जि. प. शिक्षण विभागाच्या आस्थापनेचे नाहीत तर जिल्ह्यातल्या काही माध्यमिक शाळांमधील अत्यंत होतकरू असलेल्या काही समाजसेवी कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देत या ठिकाणी बोलावयाची चर्चा आहे. शिवाय काही कर्मचारी तोंडी प्रतिनियुक्तीवर काम करत असल्याची ही चर्चा आहे.
काही नाथांनी या ठिकाणी स्वतःच नेमणूक करून खाजगी कर्मचारी ठेवली
कर्मचाऱ्या व्यतिरिक्त आदिनाथ असलेल्या काही नाथांनी या ठिकाणी स्वतःच नेमणूक करून खाजगी कर्मचारी ठेवली आहे. म्हणजे शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याने नोकर ठेवल्याचा हा किस्सा लातूर जिल्हा परिषदेतच मोठ्या अफलातून चर्चिला जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अशा वर्तणुकीचा किस्सा सर्वत्र चर्चेला जात असतानाच एका समाजसेवी कार्यकर्त्यांने याबाबत आक्षेप घेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तीन-तेरा वाजल्याचा आरोप केला आहे.
पुन्हा एकदा दिले स्मरणपत्र…
आरपीआय ए गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष अनिल गोरोबा गायकवाड यांनी याबाबत दस्तूरखुद्द माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना सहा जानेवारीला पत्र लिहिले आहे. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई वा कार्यवाही केली नाही. त्यामुळे गायकवाड यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना स्मरणपत्र दिले आहे. या कार्यालयातील 13 कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयाचे तीन-तेरा वाजले असून प्रतिनियुक्तीचा हा प्रकार बंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.