वाहतूक पोलिसांनी रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि नियम पाळण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सतत पेट्रोलिंग सुरू असून, उल्लंघन करणार्यांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून, बहुतांश घटनांमध्ये हेल्मेटचा अभाव आणि भरधाव वेग हे प्रमुख घटक ठरले आहेत. वाहनचालकांकडून होणार्या नियमभंगामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवले, वेगावर नियंत्रण ठेवले आणि वाहतुकीचे नियम पाळले तर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी आपल्या कामगारांना वाहतूक सुरक्षिततेचे नियम समजावून सांगावेत आणि नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. अनेक कामगार कामाच्या घाईत ट्रिपल सीट प्रवास करतात किंवा हेल्मेटशिवाय वाहन चालवतात, त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी उचललेली ही पावले भविष्यात मोठे सकारात्मक परिणाम दाखवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि कामगारांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अपघातमुक्त आणि सुरक्षित प्रवासासाठी सर्वांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.