कर्करोगामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण 9 टक्केfile photo
Published on
:
04 Feb 2025, 8:47 am
Updated on
:
04 Feb 2025, 8:47 am
पुणे: गेल्या काही वर्षांमध्ये असंसर्गजन्य आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जवळपास 63 टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमुळे होतात. त्यांपैकी कर्करोगामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण 9 टक्के आहे. ‘ग्लोबोकॅन’च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे 13 लक्ष 24 हजार रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग हे तीन सर्वांत जास्त आढळणारे कर्करोग आहेत.
कर्करोगाचे प्रमाण प्रति 1 लाख लोकसंखेच्या तुलनेत मुख कर्करोगाचे प्रमाण 26.3 टक्के, स्तन कर्करोगाचे प्रमाण 77.9 टक्के, गर्भाशयमुख कर्करोग 50.2 टक्के आहे. त्यामुळे कर्करोगाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे.
विशेष मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील 30 वर्षांवरील लोकांचे मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (मनपा) यांनी आपापसांत समन्वय साधून मोहिमेच्या आधी व दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए), रोटरी क्लब, लायन्स क्लब, महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स यांच्यासारख्या खासगी संस्थांना या मोहिमेबाबत माहिती देऊन त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्यामध्ये 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान राज्यामध्ये आत्तापर्यंत निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक तो उपचार विनामूल्य मिळण्यासाठी स्थानिक व जिल्हा पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात डे केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत निरोगी आयुष्यासाठी आयुष उपचार पद्धतीचा, दैनंदिन जीवनात अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.