Published on
:
16 Nov 2024, 12:06 pm
पणजी : बार्देश तालुक्यातील कांदोळी येथील रेस्टॉरंटचे मालक विश्वजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालय म्हापसाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
हे प्रकरण ऑगस्ट २०१८ चे आहे ज्यात ७/८/२०१८ रोजी विश्वजीत सिंग याने त्यांची मोटरसायकल चोरल्याबद्दल त्याचा एका कर्मचारी उमेश लमाणी याच्या विरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून नाराज होऊन लमाणी यांने आपला मित्र आणखी एक आरोपी दया शंकर साहू याला सोबत घेऊन विश्वजित सिंग याचा खून केला व पसार झाले.
त्यानंतर कळंगुटचे तत्कालिन पोलीस निरीक्षक व सध्याचे पोलिस उपधिक्षक जिवबा दळवी यांनी आरोपींना कर्नाटकातून अटक केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला होता. ज्यात प्राणघातक शस्त्रे जप्त करणे, साक्षीदार आणि पुरावे यांची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज जप्त करणे आदिंचा समावेश होता. दळवी यांनी आरोपपत्र दाखल केले होते.
खटल्यादरम्यान अनेकवेळा आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. न्यायालयाने ४२ साक्षीदार आणि डिजिटल पुरावे तपासले. ६ वर्षांच्या खटल्यानंतर आणि सर्व साक्षीदार, सीसीटीव्ही आणि वैज्ञानिक पुरावे तपासल्यानंतर सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. भादवि ३०२ अन्वये खून केल्याबद्दल दोन्ही आरोपींना ही शिक्षा सुनावली. शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ५ / २७ अंतर्गत गुन्ह्यासाठी ३ वर्षे तुरुंगवास ही ठोठावला.
तपास पथकात डीवायएसपी जिवबा दळवी, पीएसआय सीताराम मळीक, पीएसआय महेश नाईक, एएसआय सुभाष मालवणकर आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या खटल्याची फिर्याद पीपी अनुराधा तळावलीकर, पीपी जेनिफर सांतामारिया आणि पीपी रॉय डिसोझा यांनी चालवली होती. हा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एस. शर्मिला पाटील यांनी दिला.