Published on
:
18 Nov 2024, 6:57 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:57 am
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाभरात गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराचा धुरळा सोमवारी सायंकाळी 6 वाजता खाली बसणार आहे. शेवटचा दिवस असल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जाहीर प्रचार सभांचे आयोजन केले आहे. दरम्यान, आज प्रचाराचा सुपर संडे ठरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेत्यांच्या विद्यमान आमदारांच्या प्रचारसभा, प्रचारफेर्यांनी जिल्ह्यातील गावे दणाणून गेली.
काम आमचे, मुले आमची आणि लाडू वाटायचे त्यांनी, हे योग्य नाही. नगर-सोलापूर महामार्ग मी आणि आमदार राम शिंदे यांनी एकत्र येऊन बनवला आहे. यामध्ये कोणीही श्रेय घेऊ नये, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. या परिसरात पाण्याची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस आमदार प्रा. राम शिंदे हेच आहेत, असे त्यांनी आज सांगितले.
कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे यांच्या मिरजगाव येथील प्रचारसभेत गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले, की, संविधान कोणीही बदलणार नाही. काँग्रेस सरकारने संविधानात मोठ्या प्रमाणात छेडछाड केली आहे. सुरत चेन्नई 80 हजार कोटी रुपयांचा रस्त्यामुळे 1600 किलोमीटर चे अंतर 1290 किलोमीटर होणार आहे.
आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, पाच वर्षांत फक्त इव्हेंट झाले. विकास झाला नाही. विकासाची नौटंकी झाली. मागील निवडणुकीत घराण्याच्या नावावर खोटी आश्वासने देऊन मतदारसंघाची दिशाभूल केली. तुकाई चारी बंद करण्याचे पाप विद्यमान आमदाराचेच आहे. तुकाई चारीमुळे 22 गावे 27 तलावात पाणी येणार आहे. जलयुक्त च्या कामामुळे तालुका दुष्काळमुक्त झाला आहे. 2019 चे नाणे 2024 ला चालणार नाही आता हिशोब देण्याची वेळ आली आहे.