Published on
:
24 Nov 2024, 1:06 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:06 am
सिंधुदुर्ग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या रणांगणात तळकोकण म्हणून गणल्या जाणार्या सिंधुदुर्गात राणेंनी पुन्हा आपला बाणा सिद्ध केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर जिल्ह्यातील कुडाळचे आमदार वैभव नाईक ठाकरे यांच्याकडे गेले, तर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे यांच्याकडे गेले. त्यामुळे तळकोकणातील कुडाळ एकमेवच मतदारसंघ ठाकरे यांच्याकडे राहिला होता. या निवडणुकीत नीलेश राणे यांच्या विजयाने तोही मतदारसंघ ठाकरे यांच्याकडून राणे यांनी हिसकावून घेत ‘उबाठा’ला हद्दपार केले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
नीलेश राणे 2009 मध्ये लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांचा दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांनी भाजपमधून शिंदे शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढविली. त्यात एकूण 81 हजार 659 इतकी मते मिळवून 8 हजार 176 इतक्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय वैभव नाईक यांना हॅट्ट्रिक साधता आली नाही. त्यांना 73 हजार 483 इतकी मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.
कुडाळ हा जिल्ह्यातील सेन्सेटिव्ह मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. येथे प्रत्येक निवडणूक निकराची होते. शिवसेनेच्या फुटीनंतर वैभव नाईक यांनी आपल्याला मिळालेली ठाकरे यांच्या पक्षातील आमदारकी ही निष्ठेने मिळाली असून, त्यामुळे आपण शिवसेनेतच राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. तसा त्यांचा निर्णय हा पूर्ण कोकणातील राजकारणामध्ये खूपच चर्चेचा ठरला. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आणि अनेकांनी त्यांना नावेही ठेवली; पण त्यांनी आव्हान मानून ठाकरे यांच्याशी निष्ठा ठेवली.
मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आ. वैभव नाईक यांनी प्रचंड संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयच फोडले होते. राज्यभर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत होते; पण या कौतुकाचे त्यांना मतांच्या राजकारणात वळविता आले नाही. त्याचे राजकारण न करता ते केवळ राणे यांच्या कार्यपद्धतीवरच बोलत राहिले; पण ते जनतेत रूचले नाही, असेच म्हणावे लागेल. विधानसभा निवडणुकीत नीलेश राणे यांनी प्रथमच आजमावलेले नशीब मुख्यमंत्री शिंदे यांच्या वरदहस्ताने त्यांना फळास आले आणि लोकसभेच्या विजयानंतर दोन्ही मुलांच्या आमदारकीच्या विजयाने राज्याच्या राजकारणात नारायण राणेंचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.