Published on
:
31 Jan 2025, 1:20 am
Updated on
:
31 Jan 2025, 1:20 am
चिपळूण : गेले काही दिवस निकृष्ट रस्त्यांमुळे कोकणातील पर्यटनाला खीळ बसली आहे. यावर्षीच्या दिवाळीच्या सुट्टीतदेखील कोकणात येणार्या पर्यटकांची संख्या रोडावली. समुद्रकिनार्यांवर गर्दी पाहायला मिळाली. मात्र, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे पर्यटकांची संख्या कमीच होती. त्यामुळे येथील स्थानिक पर्यटनाला त्याचा मोठा फटका बसला असून, आर्थिक नुकसानदेखील सोसावे लागत आहे.
17 वर्षे झाली तरी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. रायगड जिल्ह्यातील काही भाग, तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते काटे दरम्यानचे चौपदरीकरण अजूनही अपूर्णच आहे. अनेक पूल अर्धवट स्थितीत आहेत. कोकणच्या मध्यवर्ती असणार्या चिपळूण शहरातील उड्डाण पुलाचे कामदेखील धीम्या गतीने सुरू आहे. याचा फटका महामार्गाच्या रहदारीला बसला आहे. जागोजागी डायव्हर्जन आणि खड्ड्यांमुळे पर्यटक आपली वाहने मुंबई-गोवा महामार्गावरून घालण्यास तयार नाहीत. त्यामुळे पर्यटनासाठी अन्य पर्याय निवडले जात आहेत. त्यामुळे यावर्षीतरी चौपदरीकरणाची डेडलाईन पाळली जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारा कुंभार्ली घाटरस्ता काहीअंशी सुस्थितीत असला तरी अनेक वळणांवर खड्डे पडले आहेत. या शिवाय कोयना ते पाटण या रस्त्याची दुर्दशा झाली असून, गेली अनेक वर्षे या रस्त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली येथील पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यातून बाणकोट मार्गे या शिवाय ताम्हाणी घाटातून मंडणगड, दापोलीकडे येणार्या पर्यटकांना देखील खराब रस्त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
अनेक पर्यटक थेट पुणे-बंगळुरू मार्गाने सिंधुदुर्ग, गोव्याकडे वळत आहेत. सागरी महामार्गाचे काम देखील अपूर्ण असून, अनेकवेळा पर्यटकांना फेरीबोटीसाठी प्रतीक्षा करावी लागते. फेरीबोटींना जोडणारे रस्तेदेखील अरुंद, उंच चढणीचे किंवा उताराचे आणि खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे कोकणच्या पर्यटनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.
अलिकडे ठिकठिकाणी समुद्रकिनारे आणि सह्याद्रीच्या खोर्यात अॅग्रो टूरिझम वाढत आहे. अनेक फार्म हाऊस निर्माण झाले आहेत. पर्यटकांना हे फार्म हाऊस आकर्षित करीत आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून अनेक पर्यटक कोकणकडे आकर्षित होत आहेत. अनेक पर्यटक स्वत:ची वाहने घेऊन पर्यटन करीत असतात. त्यांना आपल्या वाहनाने कोकणात फिरायला आवडते. मात्र, खराब रस्त्यांमुळे ते कोकणकडे फिरकत नाहीत. परिणामी, अनेक पर्यटन व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
कोकणात येणार्या पर्यटकांचे हाल...
मंडणगडपासून मुंबईच्या दिशेला एका बाजूचे काँक्रीटीकरण केले आहे. मात्र, दुसर्या बाजूकडील रस्ता जुनाच असून, वाहनचालकांची कसरत होत आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या रस्त्याचे देखील चौपदरीकरणाचे काम सुरू असून ठिकठिकाणी खोदाई केली आहे व सातत्याने वाहनांना डायव्हर्शन दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर मार्गे आंबा घाटातून कोकणात येणार्या पर्यटकांचे देखील मोठे हाल होत आहेत.
पर्यटनाच्या आनंदावर विरजण
तीन ऋतूत कोकणचे निसर्गसौंदर्य वेगवेगळ्या प्रकाराने पाहता येते. वर्षा सहलीसाठी कोकण विशेष महत्त्वाचा आहे. येथील हिरवा निसर्ग, कोसळणारे धबधबे आणि झोडपून काढणारा पाऊस लोकांना हवाहवासा वाटतो, तर उन्हाळ्याच्या दिवसांत समुद्रकिनार्यांवर भिजण्यासाठी अनेक पर्यटक जिल्ह्यात येतात. निसर्ग चांगला असताना येथे येण्यासाठी चांगले रस्ते नाहीत यामुळे पर्यटक नाराज होतात, अशी प्रतिक्रिया पर्यटनदूत समीर कोवळे यांनी दिली.