गुहागर : शृंगारतळी येथे महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, माजी आ. विनय नातू, आ. रवींद्र फाटक, उपनेते सदानंद चव्हाण व मान्यवर.pudhari photo
Published on
:
17 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
17 Nov 2024, 12:45 am
गुहागर : जो नराधम आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय, अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल, हे आमचे वचन आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारतळी येथे आयोजित केलेल्या राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.
या सभेला पालकमंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र पाठक, माजी आमदार विनय नातू, सदानंद चव्हाण, बळीराज सेनेचे अशोक वालम, विश्वनाथ पाटील, शामराव पेजे, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश भांगर, कोकरे महाराज, सुरेश सावंत, नीलम गोंधळी, ठाणे येथील नगरसेवक राजेश मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गुहागरमधील निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी लागणारे 10 कोटी रुपये आम्ही मंजूर करून देऊ. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोय. त्यातून जलसिंचन, आंबा, काजू प्रकिया उद्योग, पर्यटन उद्योग, रस्ते विकास यासाठी या प्राधिकरणाला अडीच हजार कोटी आम्ही देणार आहोत. त्यातून कोकणचा बॅकलॉग भरुन निघेल. गुहागर विधानसभा मतदारसंघात कोकाकोला आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र सरकार बदलल्यावर मविआतील लोक सतत काय देणार म्हणून पाठीमागे लागले होते. त्यामुळे कोकाकोला प्रकल्प उभा करण्यास तयार नव्हती. आम्ही काहीही न मागता कोकाकोलाचा मार्ग सुकर केला. त्यांनी आता कोकणात 10 पट अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.(Maharashtra assembly poll)
10 लाख तरुणांना दरमहा 10 हजार प्रशिक्षणभत्ता...
आम्ही सत्तेत आलो तर पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार आहोत. लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रु. देणार, शेतकर्यांचे कर्ज माफ करणार, किसान सन्मान योजनेतही राज्याच्या हप्त्यात आणखी 3 हजाराने वाढ करणार, जीवनावश्यक वस्तुंचे भाव पुढील पाच वर्षात स्थिर ठेवणार, 25 लाख रोजगार, 10 लाख तरुणांना दरमहा 10 हजार प्रशिक्षणभत्ता, साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपाचे बील माफ, घरगुती बिलात 30% कपात करणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मतदानानंतर डिसेंबरचा हप्ताही खात्यात जमा होणार
महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेला विरोध केला. आचारसंहितेचा बाऊ करुन हे कपटी भाऊ दोन महिन्यांचे पैसे बहीणींच्या खात्यात येऊ देणार नाहीत, हे आम्हाला माहिती होते. म्हणूनच ऑक्टोबर महिन्यात आणखी दोन हप्ते आम्ही लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा केले. 20 तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ताही तुमच्या खात्यात जमा होईल. हे हप्ते घेणारे सरकार नाही. बहिणींच्या खात्यात पैसे भरणारे हे सरकार आहे, असे ते यावेळी म्हणाले.(Maharashtra assembly poll)