Published on
:
17 Nov 2024, 1:41 pm
Updated on
:
17 Nov 2024, 1:41 pm
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मी जे लोकसभेला सांगितले. तेच विधानसभेला सांगत आहे. माझा मराठा समाज बुद्धिजीवी आहे. तो थोडाही संभ्रमात राहत नाही. मराठा समाज बरोबर पाडणार आहे. आता तुम्ही कोणत्याही पक्षात फिरा. परंतु, मतदान करताना तुमचे मतदान लेकरांच्या आणि जातीच्या बाजूने पडले पाहिजे, हे लक्षात ठेवा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी आज (दि.१७) येथे केले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे. मराठा समाज दारिद्र्यात लोटला गेला आहे. त्यामुळे आता तो रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझी विनंती आहे. आता तुम्ही संभ्रमात राहू नका. मतदान केंद्रावर जाताना फक्त जात मुलगा आणि मुलगी हे डोळ्यासमोर ठेवा. त्यानंतरच मतदान करा. आपल्याला जात मोठी केल्याशिवाय आणि आपली लेकरे मोठी होणार नाही. त्याशिवाय समाज घडवणार नाही.
मी मराठा समाजाला बंधन मुक्त केले आहे. ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मी माझा मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही. मी माझ्या समाजालाच मालक ठेवला आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी मी खंबीर आहे. फक्त राजकारण डोक्यातून काढून टाका. या राज्यात माझे मराठे शंभर टक्के मतदान करणार आहेत. मराठ्यांनी मतदान करताना विचारपूर्वक मतदान केले पाहिजे, असेच मी आवाहन करत असल्याचे जरांगे म्हणाले.
सर्व जातीवर अन्याय झाल्यानंतर लोक बदलाच्या शोधात असतात. आता राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. गरीब मुस्लिम आणि धनगरांचे मराठ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे फक्त एकट्यानेच खाऊन चालत नसते, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांना लगावला.