आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा 45 हजार 63 मतांनी दणदणीत पराभव केलाPudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 1:55 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:55 am
कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचा 45 हजार 63 मतांनी दणदणीत पराभव केला. त्यामुळे आ. महेश शिंदेच कोरेगावचे वस्ताद असल्याचे निकालातून समोर आले. तर आ. शशिकांत शिंदे यांना पराभवाच्या हॅटट्रीकला सामोरे जावे लागले. हायव्होल्टेज असलेल्या या लढाईत आ. महेश शिंदे यांना 1 लाख 46 हजार 166 तर आ. शशिकांत शिंदे यांना 1 लाख 1 हजार 103 मते मिळाली. आ. महेश शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची पोचपावती जनतेने या निकालातून दिली.
कोरेगाव येथील डी.पी. भोसले कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी 8 वाजता मतोजणीस सुरूवात झाली. पोस्टल मते मोजल्यानंतर अर्ध्या तासानंतर ईव्हीएमचे मतदान मोजण्यात आले. पहिल्या फेरीतच आ. महेश शिंदे यांनी जी मतांची आघाडी घेतली ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. महेश शिंदे यांनी पहिल्या फेरीत 2 हजार 766 मतांची आघाडी मिळवली. दुसर्या फेरीअखेर 3 हजार 650, तिसर्या फेरीअखेर 5 हजार 51, चौथ्या फेरीअखेर 5 हजार 704, पाचव्या फेरीअखेर 7 हजार 841, सहाव्या फेरीअखेर 11 हजार 412, सातव्या फेरीअखेर 13 हजार 264, आठव्या फेरीअखेर 15 हजार 117, नवव्या फेरीअखेर 17 हजार 888, दहाव्या फेरीअखेर 18 हजार 115, अकराव्या फेरी अखेर 23 हजार 281, बाराव्या फेरीअखेर 26 हजार 514, तेराव्या फेरीअखेर 28 हजार 132, चौदाव्या फेरीअखेर 30 हजार 199, पंधराव्या फेरीअखेर 32 हजार 808, सोळाव्या फेरीअखेर 34 हजार 574, सतराव्या फेरीअखेर 38 हजार 935, अठराव्या फेरीअखेर 43 हजार 325 घेतले. अखेरची फेरी व पोस्टल असे एकूण 45 हजार 63 चे मताधिक्क्य घेत आ. महेश शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला.
अन्य 15 उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे रासपचे उमेश चव्हाण यांना 321, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत कांबळे यांना 644, रिपब्लिकन सेनेचे संतोष भिसे यांना 592, अपक्ष अनिकेत खताळ यांना 73, उध्दव कर्णे यांना 48, तुषार मोतलिंग यांना 69, दादासो ओव्हाळ यांना 119, महेश किसन शिंदे यांना 62, महेश कांबळे यांना 65, महेश सखाराम शिंदे यांना 96, महेश संभाजीराव शिंदे यांना 192, सदाशिव रसाळ यांना 67, सचिन महाजन यांना 264, सोमनाथ आवळे यांना 402 व संदीप साबळे यांना 933 मते मिळाली. या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
या मतदारसंघात आ. महेश शिंदे यांनी केलेली कोट्यवधींची विकासकामे, गावागावात ठेवलेला जनसंपर्क कामी आला. याचबरोबर आ. महेश शिंदे यांच्यासाठी खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनीही ठिकठिकाणी प्रचारसभा घेत रान उठवले होते. मोठया प्रमाणात झालेले पक्षप्रवेश आणि गावोगावी केलेली बूथ बांधणी यामुळे आ. महेश शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लावली, याचाही परिणाम निकालावर दिसून आला. यामुळेच 2019 नंतर आता 2024 ला महेश शिंदेंनी आ. शशिकांत शिंदेंना दुसर्यांदा चितपट केले. गतवेळी महेश शिंदे यांनी 6 हजार 232 मतांचे लीड घेतले होते. मात्र, या निवडणुकीत हेच लीड वाढवत 45 हजार 63 इतके केले.
यामुळे आपणच कोरेगावचे वस्ताद असल्याचे महेश शिंदेंनी दाखवून दिले. आ. शशिकांत शिंदे यांनी लढत दिली. परंतु, नागरिकांनी विकासकामांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. त्यातच वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याने आ. शशिकांत शिंदेंना धक्का दिला. कोरेगावमधील काँग्रेस नेत्यांची साथ मिळूनही शशिकांत शिंदेंना अपयश आले. गेल्या काही कालावधीत जुन्या कार्यकर्त्यांशी नाळ तुटली. अनेक असंतुष्ट पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. महेश शिंदेंचे काम पाहून त्यांचे नेतृत्व स्वीकारले. मोठ्या गावांमध्ये कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्य कमी पडल्यानेच आ. शशिकांत शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले. निकालानंतर आ. महेश शिंदे यांची गुलालाची उधळण करत कोरेगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘महेश शिंदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘हा आवाज कुणाचा’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. चौकातचौकात फटाके लावून गुलालाच्या उधळणीत आनंद साजरा करण्यात आला. यामुळे शहरातील सर्व रस्ते गुलालाने माखले होते.