कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे वादळ; ‘महाविकास’ची धूळधाण

2 hours ago 1

कोल्हापूर : मतमोजणीनंतर विजयाचा कल स्पष्ट होताच अमल महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी येथील त्यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. (छाया : नाज ट्रेनर)

पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 12:26 am

Updated on

24 Nov 2024, 12:26 am

कोल्हापूर : जिल्ह्यात महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची अक्षरश: धूळधाण झाली. गतवेळी चार जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसला यावेळी एकही जागा राखता आली नाही. त्यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाताहत झाली. नव्याने अस्तित्वात आलेल्या या दोन्ही पक्षांनाही जिल्ह्यात खाते खोलता आले नाही.

जिल्ह्यातील दहांपैकी लढवलेल्या कोल्हापूर उत्तर, करवीर आणि राधानगरी या तीनही जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी या दोन्ही जागा भाजपाने आणि शाहूवाडी व हातकणंगले या दोन्ही जागा जनसुराज्य शक्तीने जिंकल्या. महायुतीने पाठिंबा दिलेला उमेदवारच शिरोळच्या जागेवर विजयी झाला. राष्ट्रवादीला मिळालेल्या दोन जागांपैकी कागलमध्ये विजय मिळवता आला; मात्र चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून अपक्षाने विजयाचा झेंडा फडकावला. निकाल जाहीर होताच जिल्ह्यात महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, साखर-पेढे, मिठाई वाटप करत आनंदोत्सव सुरू केला. उशिरापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष सुरू होता.

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचा भगवा; राजेश क्षीरसागर विजयी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा 29 हजार 563 मताधिक्यांनी पराभव केला. कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेेतली. यामुळे या मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार आणि हात हे चिन्हच गेले. यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल अशी शक्यता प्रारंभी होती. मात्र, महाविकास आघाडीने अपक्ष राजेश लाटकर यांना पुरस्कृत करत बळ देण्याचा प्रयत्न केला. यामुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. त्यात क्षीरसागर यांनी बाजी मारली. क्षीरसागर यांना 1 लाख 11 हजार 85 इतकी मते तर लाटकर यांना 81 हजार 522 इतकी मते मिळाली.

कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा अमल महाडिक

संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पुन्हा महाडिकांचा ‘अमल’ सुरू झाला. प्रारंभीपासून चुरशीच्या झालेल्या या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा 17 हजार 630 इतक्या मतांनी पराभव करत अमल महाडिक यांनी गतवेळच्या पराभवाचे उट्टे काढले. महाडिक आणि पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याला परिचित आहे. हा संघर्ष यंदाच्या निवडणुकीतही होता. यामुळे कोल्हापूर दक्षिणमधील ईर्ष्या टोकाला गेली होती. त्यातून प्रचंड चुरशीने झालेल्या या निवडणुकीत अमल महाडिक यांनी बाजी मारली. महाडिक यांना एकूण 1 लाख 48 हजार 892 इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी ऋतुराज पाटील यांना एकूण 1 लाख 29 हजार 656 इतकी मते मिळाली.

कागल मुश्रीफांचेच; डबल हॅट्ट्रिक

कागल मतदारसंघ हसन मुश्रीफ यांचाच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. डबल हॅट्ट्रिक साधताना मुश्रीफ यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला. संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या अटीतटीच्या लढतीपैकी ही एक लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिस्पर्धी समरजित घाटगे यांनी दिलेल्या कडव्या आव्हानामुळे तीन तालुक्यांत विखुरलेल्या मतदार संघात प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण झाली होती. आरोप-प्रत्यारोपाने मतदार संघातील ईर्ष्या टोकाला गेली होती. त्यातून जिल्ह्यात 82 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. मात्र, पहिल्याच फेरीपासून मुश्रीफ यांनी आघाडी घेत मतदार संघातील आपले वर्चस्व दाखवून दिले. मुश्रीफ यांनी 11 हजार 879 इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवला. त्यांना 1 लाख 43 हजार 828 इतकी मते मिळाली तर प्रतिस्पर्धी घाटगे यांना 1 लाख 31 हजार 949 इतकी मते मिळाली.

राधानगरी शिवसेनेची; प्रकाश आबिटकरांची हॅट्ट्रिक

राधानगरी मतदारसंघात चुरशीने झालेल्या लढतीत शिवसेने बाजी मारली. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के.पी.पाटील यांना 38 हजार259 इतक्या मतांनी पराभूत करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. सलग तीन वेळा निवडून येणारे ते राधानगरी मतदार संघातील पहिले आमदार ठरले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी त्यांना कडवे आव्हान दिले होते. यामुळे मतदार संघात चुरस दिसत होते. मात्र, के. पी. पाटील यांचे आव्हान लिलया पेलत आबिटकर यांनी तिसर्‍यांदा बाजी मारली. आबिटकर यांना एकूण 1 लाख 44 हजार 359 इतकी मते मिळाली, तर के. पी. पाटील यांना एकूण 1 लाख 6 हजार 100 इतकी मते मिळाली.

करवीरच्या अटीतटीच्या लढतीत नरके यांची बाजी

करवीर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना काँग्रेसचे दिवंगत, आमदार पी.एन.पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी आव्हान दिले होते. जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक ठरलेल्या या लढतीत प्रारंभी नरके यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून आघाडी घेणार्‍या नरके यांचा विजय सोपा वाटत असताना चित्र पलटले आणि राहुल पाटील यांची आघाडी वाढत गेली. अखेरच्या पाच-सहा फेरीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. मतांच्या आघाडीत होणार्‍या चढ-उताराने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. मात्र,1 हजार 976 इतके मताधिक्य घेत नरके यांनी विजय मिळवत गतवेळच्या पराभवाचे उट्टे काढले. नरके यांना एकूण 1 लाख 34 हजार 528 इतकी मते मिळाली तर राहूल पाटील यांना 1 लाख 32 हजार 552 इतकी मते मिळाली.

शाहूवाडीतून विनय कोरे यांचा पाचव्यांदा विजय

शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे यांनी विजय मिळवला. कोरे यांचा विधानसभा निवडणुकीतील हा आजवरचा पाचवा विजय ठरला. या मतदारसंघातही निवडणुकीत चुरस होती. काही भागात तर अटीतटीचे वातावरण होते. मात्र, कोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, माजी आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांचा 36 हजार 53 इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीतही सरूडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कोरे यांना एकूण 1 लाख 36 हजार 64 इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी सरूडकर यांना एकूण 1 लाख 11 इतकी मते मिळाली.

हातकणंगले ‘जनसुराज्य’ला शक्ती; डॉ. माने विजयी

हातकणंगले मतदारसंघाने ‘जनसुराज्य’ला शक्ती दिली. तिहेरी रंगलेल्या या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. अशोकराव माने विजयी झाले. महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांचा 46 हजार 249 इतक्या मतांनी त्यांनी पराभव केला. तिसर्‍या आघाडीचे उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रिंगणात उतरलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर तिसर्‍या स्थानावर फेकले गेले. डॉ. माने यांच्या पारड्यात मतदारांनी एकूण 1 लाख 34 हजार 191 इतकी मते दिली. आवळे यांना 87 हजार 942 इतकी मते मिळाली. डॉ. मिणचेकर यांना 24 हजार 952 इतकी मते मिळाली.

इचलकरंजीतून राहुल आवाडे विजयी

इचलकरंजी मतदारसंघातून भाजपाचे राहुल आवाडे यांनी सहज विजय मिळवला. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांचा त्यांनी 56 हजार 811 इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आवाडे यांना निवडणुकीत कडवे आव्हान निर्माण होईल, अशी शक्यता होती; मात्र, आवाडे गट, भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत आवाडे यांचा विजय सोपा केला. पहिल्या फेरीपासूनच आवाडे यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. आवाडे यांना एकूण 1 लाख 31 हजार 919 इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी मदन कारंडे यांना एकूण 75 हजार 108 इतकी मते मिळाली.

शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर दुसर्‍यांदा विजयी

महायुतीच्या पाठिंब्यावर शिरोळ मतदारसंघातून राजर्षी शाहू आघाडीकडून निवडणूक लढवणार्‍या विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर सलग दुसर्‍यांदा विजयी झाले. महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या गणपतराव पाटील यांचा त्यांनी 40 हजार 816 इतक्या मताधिक्यांनी पराभव केला. तिसर्‍या आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे माजी आमदार उल्हास पाटील तिसर्‍या स्थानावर गेले. यड्रावकर यांना 1 लाख 34 हजार 630 इतकी मते मिळाली. गणपतराव पाटील यांना 93 हजार 814 इतकी मते मिळाली. उल्हास पाटील यांना अवघ्या 25 हजार 10 इतक्या मतावर समाधान मानावे लागले.

चंदगडमधून अपक्ष शिवाजी पाटील यांचा विजय

गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चंदगड मतदार संघातून विजयाचा झेंडा फडकावला. महायुतीत झालेल्या बंडखोरीने विद्यमान आमदार राजेश पाटील यांना मात्र पराभव पत्कारावा लागला. शिवाजी पाटील यांनी 24 हजार 134 इतके मताधिक्य घेत विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभूळकर तिसर्‍या स्थानावर गेल्या. जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवार असलेल्या या मतदारसंघात लढत मात्र तिरंगीच झाली. अपक्षांच्या भाऊगर्दीत अपक्षाचाच विजय झाला. शिवाजी पाटील यांना एकूण 84 हजार 254 इतकी, राजेश पाटील यांना 59 हजार 475 इतकी तर नंदाताई बाभूळकर यांना 46 हजार 487 इतकी मते मिळाली.

आणखी दोन जिल्हा परिषद सदस्य विधानसभेत

जिल्हा परिषदेतील मावळत्या सभागृहातील सदस्य राहुल आवाडे आणि डॉ. अशोकराव माने विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. यामुळे यंदाच्या विधानसभेच्या सभागृहात जिल्ह्यातील यापूर्वीच्या प्रकाश आबिटकर व अमल महाडिक यांच्यासह आवाडे आणि डॉ. माने असे चार जिल्हा परिषदेचे सदस्य आमदार म्हणून काम करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article