Published on
:
01 Feb 2025, 1:46 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:46 am
कोल्हापूर : जिल्ह्यातील पाणथळ क्षेत्रे अधिसूचित (नोटिफाईड) होणार आहेत. याकरिता ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोल्स्टल मॅनेजमेंट’ (एनसीएससीएम) या केंद्रीय संस्थेचे पथक 13 दिवस जिल्ह्यातील 231 पाणथळ जागांचे सर्वेक्षण करणार आहे.
राज्यातील पाणथळ क्षेत्र अधिसूचित केले जाणार आहे. याकरिता संबंधित जागांचे नकाशे, तसेच सविस्तर शासकीय दस्तावेज तयार केले जाणार आहेत. याकरिता राज्य शासनाने नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोल्स्टल मॅनेजमेंट या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार संबंधित संस्थेने राज्यातील विविध जिल्ह्यांत सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही देशातील सर्व पाणथळ जागांचे तीन महिन्यांत सर्वेक्षण करावे, असे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने याबाबत सर्व जिल्हाधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत राज्य शासन व ‘इस्रो’च्या ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’कडे (एस.ए.सी.) नोंद असलेल्या 2 हजार 460 जागांचे सर्वेक्षण होणार आहे. याखेरीज स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध यादी, माहिती तसेच सूचनांनुसार या जागांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राज्य शासनाकडील आकडेवारीनुसार 145 पाणथळ जागा आहेत. प्रशासनाकडील माहितीनुसार 231 जागा आहेत. त्यानुसार 12 तालुक्यांतील 231 जागांचे सर्वेक्षण होणार आहे. याकरिता नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोल्स्टल मॅनेजमेंट या संस्थेचे सहाजणांचे पथक येणार आहे. दि. 2 फेबुवारी रोजी या पथकाकडून सर्वेक्षण सुरू होईल, ते दि. 14 फेब—ुवारीपर्यंत चालणार आहे.
या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिका, नगरपालिका, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वन, मत्स्य, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ‘एनसीएससीएम’ पथक यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक विभागाने या पथकाच्या मदतीसाठी नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.