भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ (फेब्रुवारी) महिन्यातील माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.Pudhari News Network
Published on
:
01 Feb 2025, 4:32 am
Updated on
:
01 Feb 2025, 4:32 am
ठाणे : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ (फेब्रुवारी) महिन्यातील माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. हिंदुत्ववादी सरकारमुळे यंदा यात वाढ झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात 158 सार्वजनिक तर 2 हजार 261 खाजगी गणेशमुर्ती असे जिल्ह्यात 2 हजार 419 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. गतवर्षी 157 सार्वजनिक तर,1 हजार 776 घरगुती गणेशोत्सव साजरे झाले होते.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी गणेश भक्तांची सजावटीसाठी लगबग सुरू झाली आहे.ठाणे शहरात सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव हे उत्साहात साजरे केले जातात. माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकाराकडे गणेश मूर्तीच्या नोंदणीसाठी सुरूवात झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून माघी गणपतीला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामध्ये दीड, पाच, सात, दहा, अकरा दिवसाच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमुर्तींचे आगमन होत आहे. शनिवार 1 फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाली माघ शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती आहे. त्यामुळे गणेश मुर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 53 मिनिटांपर्यंत आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील माघी गणेशोत्सव
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या पाचही परिमंडळांमध्ये मोठया उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक घरगुती गणपतींची स्थापना भिवंडी परिमंडळात होणार आहे. ठाणे - घरगुती 356 तर सार्वजनिक 22, भिवंडी - घरगुती 776 तर सार्वजनिक 6, कल्याण- घरगुती 705 तर सार्वजनिक 66, उल्हासनगर घरगुती 259 तर सार्वजनिक 33 आणि वागळे- घरगुती 165 तर सार्वजनिक 31 अशी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.