कर्जत : राज्य सरकारने शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा डंका पिटवत अनुदानावर सौरपंप दिले खरे, पण दोनच दिवसातच ते बंद पडून मुबलक पाणी असूनही शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
संबंधित कंपन्यांनी सौरपंप दुरुस्तीसाठी प्रतिनिधी पाठविले नाही,तर नुकसानभरपाईची तक्रार ग्राहक मंचाकडे करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी सौर पंप बसविण्यासाठी प्रवृत केले आहे. हे सौरपंपही चिरीमिरी दिल्याशिवाय मिळत नाहीत. मिळाले तर संबंधित कंपन्या सौरपंप बसवून एकदा पाणी विहिरीतून बाहेर काढून फोटो काढून मोकळे होतात. परंतु त्यानंतर यात काही घोटाळा झाला तर दुरुस्तीला कंपनीचा कोणीही येत नाहीत. त्यामुळे शेतकर्यांची अवस्था ’भीक नको, पण कुत्रे आवर’ अशी झाली आहे.