गुटखा, पानमसाला, तंबाखू यासारख्या संवेदनशील वस्तूंची जीएसटी चुकवेगिरी उघडकीस येणार आहे
Published on
:
05 Feb 2025, 1:36 am
कुपवाड : गुटखा, पानमसाला, तंबाखू यासारख्या संवेदनशील वस्तूंची जीएसटी चुकवेगिरी उघडकीस येणार आहे. जीएसटी परिषदेच्या 55 व्या बैठकीत करचोरी रोखण्यासाठी काही वस्तूंसाठी ‘ट्रॅक अँड ट्रेस’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास अनुसरून नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अंदाजपत्रकात जीएसटी कायद्यामध्ये बदलाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत.
गुटखा, पानमसाला, तंबाखू यासारख्या संवेदनशील वस्तूंच्या करचोरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘ट्रॅक अँड ट्रेस’ ही ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना सूत्रांनी सांगितले की, ट्रॅक अँड ट्रेसअंतर्गत, ज्या वस्तू किंवा कमोडिटी यामध्ये कर चुकवेगिरीची मोठी शक्यता आहे त्याच्या पॅकेट्सवर विशिष्ट चिन्ह लावले जाईल. जेणेकरून यामुळे पुरवठा साखळीत त्यांचा मागोवा घेणे सोपे होईल. असे केल्याने करचोरीवर नियंत्रण मिळवता येते आणि करचोरी करणारे सहज पकडले जातील. हे मार्किंग न मिटवण्यासारखे असल्याने सदर कमोडिटीच्या करचोरीचा ट्रॅक आणि ट्रेस घेणे हे शासनास सोपे जाणार आहे.