Published on
:
04 Feb 2025, 1:43 am
Updated on
:
04 Feb 2025, 1:43 am
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 19 लाख 66 हजार घरकुलांच्या उभारणीचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आतापर्यंत 16 लाख 81 हजार 531 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा वॉररूमध्ये आढावा घेतला. यामध्ये आरोग्य, गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्य:स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.
फडणवीस म्हणाले की, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, उर्वरित लाभार्थ्यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयाने मार्ग काढावेत. ज्या जिल्ह्यांत घरकुलांचे उद्दिष्टपूर्ती कमी आहे, तेथील जिल्हाधिकार्यांनी ती पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावेत. घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना वेग द्यावा. गायरान जमिनींवरही आवास योजना राबविण्यासाठी कार्यवाही करावी. आवास योजनांसाठीच्या जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे. घरकुलांसाठी वाळू, विटा व सिमेंट आदी एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी घरकुल मार्ट संकल्पना राबविण्यात यावी. यासाठी बचत गटांचे सहाय्य घ्यावे. शहरी भागातील आवास योजनांना गती देण्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश द्यावे. तसेच आवास योजनांच्या प्रगतीची माहिती नियमित अद्ययावत करावी. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनची मंजुरी, कामे आदी कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगाने करावी, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आयुष्मान कार्डच्या प्रत्यक्ष 100 टक्के वितरणाकरिता तांत्रिक अडचणी दूर करून आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठीही आयुष्मान कार्डसारखे कार्ड तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जलजीवन मिशनची कामे वेगाने करा
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने, कालमर्यादेत व गुणवत्ता पूर्ण करावीत. या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास विजेबरोबरच वीज बिलात बचत होईल, असेही फडणवीस म्हणाले.
आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्या
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनांचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळावा, यासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसेच यामधील मानवी हस्तक्षेपविरहित डिजिटल यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या दोन्ही योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त खासगी रुग्णालयाचा तसेच मुंबई शहर व उपनगरातील महापालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश करावा, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.