Published on
:
07 Feb 2025, 1:06 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:06 am
बेळगाव : बेळगावपासून 12 कि.मी. अंतरावर असलेल्या भुतरामहट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयातील निरुपमा नावाच्या सिंहिणीचा गुरुवारी (दि. 6) दुपारी दोन च्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात आता केवळ कृष्णा नावाचा एकमेव सिंह शिल्लक राहिला आहे. प्राणिसंग्रहालयात तीन सिंह आणले होते. त्यातील शौर्य नामक सिंहाचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे, निरुपमा व कृष्णा असे दोनच सिंह शिल्लक होते. आता निरुपमा सिंहिणीचाही मृत्यू झाला आहे. या महिन्याच्या सुरवातीपासूनच निरुपमा आजारी होती. तिच्यावर उपचार सुरु होते. पण, खाणे कमी केल्याने तिची तब्येत ढासळत होती. तिला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
वाघ व सिहांचे आगमन झाल्यानंतर प्राणीसंग्रहालयाचे आकर्षण वाढले होते. परंतु, त्यांच्या पालनपोषणासह देखभालीचा खर्चही वाढला होता. हा खर्च पेलवत नसल्याने वनखात्याने प्राणी दत्तक योजना सुरु केली होती. सुरवातीला या योजनेला प्रतिसाद मिळाला. लोकप्रतिनिधी, आमदार व मंत्र्यांसह समाजातील दानशुरांनी प्राणी दत्तक घेतले होते. मात्र, अलीकडे या योजनेलाही फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे, खर्च वाढत होता. तसेच प्राण्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होत होती. त्यामुळे, सिंह सतत आजारी राहू लागले. त्यातूनच गतवर्षी शौर्य सिंहाचा मृत्यू झाला होता. आता निरुपमाचाही मृत्यू झाल्याने प्राणीसंग्रहालयातील अव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.