Published on
:
07 Feb 2025, 3:44 am
Updated on
:
07 Feb 2025, 3:44 am
सेनगाव : पुढारी वृत्तसेवा
हिंगोली ते रिसोड मार्गावर कवठा पाटी जवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (बुधवार) रात्री घडली. या अपघातानंतर बस चालकाने बस जागेवरच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील शेख आरेफ शेख युनुस (वय 38) यांचे पोल्टी फॉर्म असून या ठिकाणी गावातीलच उत्तम भगत (60) हे काम करतात. बुधवारी रात्री दोघेही त्यांच्या दुचाकी वाहनावर कोळसा येथून कवठापाटीकडे आले होते. यावेळी काम आटोपून ते परत गावाकडे जाण्यासाठी निघाले असतांना रिसोड कडून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये उत्तम भगत यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेख आरेफ गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर बस चालकाने बस घटनास्थळावर सोडून पळ काढला.
या अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे, जमादार सुभाष चव्हाण, राजेश जाधव, राम मारकळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या शेख आरेफ यांना तातडीने उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र शेख आरेफ यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.
दरम्यान, मयत उत्तम भगत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेनगावाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. तर घटनेमुळे कोळसा गावावर शोककळा पसरली आहे.