बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना दोषी ठरवलं होतं. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र आता या प्रकरणी एक मोठा ट्वीस्ट आला आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही, असे सांगितले आहे. आता त्यांच्या या मागणीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. गुन्हा नोंद होण्याच्या आधी अक्षयच्या आई – वडिलांनी माघार घ्यावी. यामध्ये राजकारण आहे हे दृष्टीहीन, मुके-बहिरेही सांगतील. पण, कायद्याने असा खटला मागे घेतला जाऊ शकतो का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यासोबत त्यांनी कायदा इतका पायदळी तुडवू नका! अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार हे नक्की !!, असेही म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
अक्षय शिंदेच्या आई – वडिलांनी, ” हा खटला आम्हाला आता लढायचा नाही”, असे न्यायालयापुढे सांगितले. मा. उच्च न्यायालयाने स्वतःहून या केसमध्ये लक्ष घातले आहे. ही चकमक खोटी असल्याचे मा. न्यायालयाने पहिल्या दिवसापासूनच सूचित केले होते. त्यानंतर सादर झालेल्या अहवालातून ही चकमक पूर्णतः खोटी असल्याचे सिद्ध झाले आणि कारवाई करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
आमच्यासारख्या काही जणांना माहित होते की, या खटल्यादरम्यान अक्षय शिंदेच्या आई-वडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. अखेरीस त्या गरीब मायबापाने आपल्या मुलाच्या मृत्युचे ओझे हृदयावर असतानादेखील घाबरून ही केस मागे घेतली. कुणी एवढे दुधखुळे नसतं की, एवढी पुढे गेलेली केस मागे घेतली जाईल. प्रश्न आता असा आहे की, ही केस आई-वडिलांच्या सांगण्यावरून मागे घेतली जाऊ शकते का?
ही चकमक खोटी असल्याचे अहवालात सिद्ध झाले आहे. तो अहवाल मा. उच्च न्यायालयाने पोलिसांकडे दिलेला असून पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी, आम्ही कारवाई करतो, असे मा. उच्च न्यायालयातच सांगितले आहे. असे असतानाही गेले अनेक दिवस गुन्ह्याची नोंदच करण्यात आली नाही. त्यामागील कारणच हे होते की, गुन्हा नोंद होण्याच्या आधी अक्षयच्या आई – वडिलांनी माघार घ्यावी. यामध्ये राजकारण आहे हे दृष्टीहीन, मुके-बहिरेही सांगतील. पण, कायद्याने असा खटला मागे घेतला जाऊ शकतो का? कायदा असा मोडीत काढला जाऊ शकतो का? हा खरा प्रश्न आहे. आता ही सर्व चकमक सार्वजनिक दस्तावेज आहे. हे आता जनतेच्या न्यायालयात आहे. त्यामुळे अक्षयच्या आई-वडिलांनी जरी माघार घेतली असली तरी केस अशाप्रकारे कोर्टातून बाद होईल, असे मला तरी वाटत नाही. जर चकमकच खोटी असल्याचा अहवालच आहे तर त्याच्या आई-वडिलांनी माघार घेऊन चकमक खरी आहे, हे तर सिद्ध होत नाही. त्यामुळेच खोट्या चकमकीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत. परिणामी, गुन्हा दाखल करणे पोलिसांना क्रमप्राप्त आहे. यातून पळ काढण्यासाठी जर असे उद्योग केले जात असतील तर ते निंदनीय आहेत. कायदा इतका पायदळी तुडवू नका! अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार हे नक्की !!, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
अक्षय शिंदेच्या आई – वडिलांनी, ” हा खटला आम्हाला आता लढायचा नाही”, असे न्यायालयापुढे सांगितले. मा. उच्च न्यायालयाने स्वतःहून या केसमध्ये लक्ष घातले आहे. ही चकमक खोटी असल्याचे मा. न्यायालयाने पहिल्या दिवसापासूनच सूचित केले होते. त्यानंतर सादर झालेल्या अहवालातून ही चकमक पूर्णतः…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 6, 2025
दरम्यान काल कोर्टात सुनावणी सुरू असताना अक्षय शिंदेची आई अलका अण्णा शिंदे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यावेळी त्यांनी आम्हाला हा खटला लढायचे नसल्याचे सांगितले. अण्णा शिंदे यांनीदेखील हीच मागणी केली. लोकांकडून खूप त्रास दिला जातो. या वयात आता आम्हाला धावपळ शक्य नाही. आमचाही मुलगा गेला असल्याचे त्यांनी सांगितले. यावर कोर्टाने तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, असे विचारले. त्यावर आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याचे अक्षयच्या पालकांनी सांगितले. आता कोर्ट त्यावर आज निर्णय देणार आहे.