चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांनी अत्यंत कडवी लढत देत महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांच्याविरोधात विजय मिळविला. या निवडणुकीत शेखर निकम यांना 96,555 तर विरोधी उमेदवार यादव यांना 89,688 मते मिळाली. यामुळे शेखर निकम यांचा 6,867 मतांनी विजय झाला. या निवडणुकीत चिपळूणपेक्षा संगमेश्वरने शेखर निकम यांना तारले आणि आमदारकीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, या मताधिक्क्याबाबत आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे दोन तास उशिराने निकाल जाहीर करण्यात आला.
चिपळूण-संगमेश्वरची निवडणूक राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी झाली. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे गृहीतच होते. चिपळूण तालुक्यामध्ये आ. शेखर निकम यांना अत्यल्प मताधिक्य मिळाले. मात्र, सावर्डेमधील बूथनंतर शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम राखली व विजय संपादन केला. विशेषकरून संगमेश्वर तालुक्यातील मतदारांनी शेखर निकम यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला व त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.
सकाळी 8 वा. शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली मतदानाने मोजणीला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी शेखर निकम यांच्याविरोधात 278 मतांची आघाडी घेतली. त्यांना पहिल्या फेरीत 4 हजार 752 तर शेखर निकम यांना 4 हजार 474 मते मिळाली. दुसर्या फेरीमध्ये देखील यादव यांना 4 हजार 381 तर निकम यांना 4 हजार 195 मते मिळाली. त्यामुळे दुसर्या फेरीत 465 मतांची आघाडी झाली. तिसर्या फेरीत यादव यांना 5,773 तर निकम यांना 3493 मते मिळाली. या फेरीमध्ये 2,745 ची आघाडी मिळविली. चौथ्या फेरीमध्ये यादव यांना 4,007 तर निकम यांना 5,280 मते मिळाली. या फेरीत निकम यांनी प्रथमच 1,273 ची आघाडी मिळवली. त्यामुळे यादव हे या फेरीअखेर 1,472 मतांनी आघाडीवर राहिले.
पाचव्या फेरीत यादव यांना 4,707 तर निकम यांना 4,268 मते मिळाली. त्यामुळे या फेरीअखेर त्यांची आघाडी 1918 मतांची झाली. सहाव्या फेरीत यादव यांना 4,471 तर निकम यांना 4,493 मते मिळून ते या फेरीमध्ये 22 मतांनी आघाडीवर राहिले. सातव्या फेरीमध्ये यादव यांना 4,862 तर निकम यांना 4,421 मते मिळाली. आठव्या फेरीमध्ये यादव यांनी 4,943 तर निकम यांनी 3,563 मते घेतली. त्यामुळे यादव 3,711 मतांनी आघाडीवर राहिले. नवव्या फेरीमध्ये यादव यांना 4,413 तर निकम यांना 3,853 मते, नवव्या फेरीत यादव 4,271 ने आघाडीवर राहिले. दहाव्या फेरीमध्ये यादव यांना 3,898 तर निकम यांना 5,136 मते मिळाली. यावेळी निकमांनी 1238 मतांची आघाडी घेतली आणि दहाव्या फेरीअखेर यादव 3,033 ने आघाडीवर राहिले. मात्र, या फेरीपासून निकम यांनी आघाडी घेत अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवली. अकराव्या फेरीमध्ये यादव यांना 3,781 तर निकम यांना 4019 मते मिळाली. या फेरीनंतर हळूहळू यादव यांचे मताधिक्य कमी होऊ लागले. अखेर शेखर निकम यांना 6867 मतांची आघाडी मिळाल्याने शेखर निकम यांना विजय घोषित करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.
अजितदादांचा फोन.., हुरहुर अन निर्णायक आघाडी
चिपळूण-संगमेश्वर विधानसभेची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या अकरा फेरींमध्ये महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी आघाडी घेतली होती. याच टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा शेखर निकम यांना फोन आला व त्यांनी मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शेखर निकम भावूक झाले आणि त्यांनी ‘....दादा सॉरी! आपण मला खूप निधी दिलात. मात्र मतांमध्ये आपण कमी पडत आहोत. असे सांगून सॉरी म्हटले.’ मात्र, या नंतर संगमेश्वर तालुक्याने आ. शेखर निकम यांना तारले आणि पुढे त्यांचा विजय निश्चित होत गेला. यानंतर शेखर निकम यांनी अजित पवार यांना दूरध्वनी करून आपण निर्णायक आघाडी घेतल्याचे सांगितले.