Published on
:
24 Nov 2024, 12:58 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:58 am
कोल्हापूर ः अत्यंत अटीतटीने आणि चुरशीने झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या लढाईत अखेर महायुतीअंतर्गत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारली. पहिल्यांदा एकतर्फी वाटणारी निवडणूक सतेज पाटील यांनी प्रतिष्ठेची केल्याने त्यात रंगत भरत गेली. विरोधी महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर यांना क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्याने पराभवाची धूळ चारली. मतदारांनी कोल्हापूर उत्तरमधून पुन्हा क्षीरसागरांचा राजेश असा आदेश दिला. कोल्हापूरच्या विकासासाठी क्षीरसागर यांनी दिलेल्या हाकेला मतदारांनी साद देत त्यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला.
कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सातपैकी पाचवेळा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने भगवा झेंडा फडकविला आहे. काँग्रेसने दोनवेळा विजय मिळविला आहे. परंतु, पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेस पक्ष रिंगणात नव्हता. काँग्रेसचा हात निवडणुकीतून गायब झाल्याने अपक्षाला पुरस्कृत करण्याची नामुष्की आली. अपक्ष लाटकर यांची सारी मदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला कसबा बावडा आणि पाटील यांच्यावरच विसंबून होती. क्षीरसागर यांनी 2019 ला पराभूत झाल्यानंतर दुसर्या दिवसापासूनच समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले होते.
क्षीरसागर यांच्या सामाजिक आणि विकासात्मक कामाचे फळ म्हणून 2024 च्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस मते देऊन त्यांना निवडून दिले. क्षीरसागर यांना पेठांनी मोठे मताधिक्य मिळवून दिले आणि कोल्हापूर उत्तरवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला.
महायुतीअंतर्गत शिवसेनेकडून क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित होती. परंतु, महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार? हे स्पष्ट नव्हते. काँग्रेसकडे मतदारसंघ गेल्यानंतर उमेदवारीचा घोळ झाला. काँग्रेसने लाटकर यांना उमदेवारी जाहीर केली. परंतु, तब्बल 27 नगरसेवकांनी लाटकर यांना विरोध करून उमेदवारी बदलण्याची मागणी केली. परिणामी, उमेदवारी बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढविली. लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, लाटकर यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत उमदेवार मधुरिमाराजे यांनीच थेट उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिनवरून काँग्रेसचे हात चिन्ह गायब झाले आहे.
क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच विकासाच्या मुद्द्यावरून प्रचारात आघाडी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील विकासकामांना आणलेला निधी आणि त्यातून होत असलेली विकासकामे हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे रंकाळा तलावाचा कायापालट केल्याचे क्षीरसागर यांनी आवर्जून सांगितले. काँग्रेसकडून क्षीरसागर यांच्या बाबतीत यापूर्वी घडलेल्या घटनांचे जुने व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. मात्र, निवडणुकीत हे होणार असेे ग्रहीत धरून क्षीरसागर यांनी त्यासंदर्भात व्हिडीओद्वारेच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्या विरोधातील व्हिडीओची धार कमी झाल्याचे दिसून आले.
क्षीरसागरांवरील आरोपांना चोख उत्तर
ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसकडून राजेश क्षीरसागर यांच्यावर अनेक आरोप झाले. क्षीरसागर यांच्या बाबतीत जुने व्हिडीओ आणि नकारात्मक बातम्यांचे पेन ड्राईव्हचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी घरोघरी क्षीरसागर यांच्या विरोधात पुस्तिका वाटल्या. मात्र, क्षीरसागर यांनी याकडे दुर्लक्ष करून विकासात्मक प्रचार केला. विरोधकांच्या टीकेतून क्षीरसागर यांना सहानुभूती मिळत गेली. परिणामी, आरोपांना जनतेनेच चोख उत्तर दिल्याचे मतदानातून स्पष्ट झाले.