मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. File Photo
Published on
:
07 Feb 2025, 9:15 am
Updated on
:
07 Feb 2025, 9:15 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: 'एकही चुटकुला बार बार सुनाया जाए, तो ऊसपर हंसा नहीं करते', असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधीसह ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरून गंभीर आरोप केले. यावर फडणवीस यांनी निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाबाबतची सर्व उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. किती मतदार वाढले ते कुठे वाढले, ते कसे वाढले निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे. आता ही जी तयारी राहुल गांधींची चालली आहे. ते दिल्लीमध्ये त्यांचा मोठा पराभव होणार आहे, त्याचे कव्हर फायरिंग करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका करून जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत घालतील, तोपर्यंत त्यांचा पक्षाचे रिवायवल होणार नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आढळून आली. महाराष्ट्रात ५ महिन्यांत इतके मतदार कसे वाढले? असा सवालदेखील त्यांनी केला. याचवेळी हिमाचल प्रदेशमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढेच मतदान झाले आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेत विरोधक नाहीत - बावनकुळे
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरे दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.