Published on
:
08 Feb 2025, 9:57 am
Updated on
:
08 Feb 2025, 9:57 am
जळगाव | भुसावळ तालुक्यातील वरणगावा मध्ये सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक आली असताना गाण्याच्या वादातून मिरवणुकीवर दगडफेक होऊन आठ जण जखमी झाले. या प्रकरणी पाच जणांविरोधात वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिराजवळ दि. 7 रोजी 9 : 30 वाजता रमाबाई आंबेडकर मिरवणूक आली. रात्री मिरवणुकीत साऊंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर काहींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि "तू शिवाजी चौकात भीमगीते का वाजवतो?" असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली.
यानंतर, भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता काहींनी "बंद करा महारांचे गाणे, आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो," असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रॉलीवर ठेवलेल्या रमाई माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तींचे नुकसान झाले. या घटनेत अंजनाबाई गौतम जोहरे, दुर्गा सुनील भालेराव, उत्तम बंडू जोहरे, अजय प्रकाश बोदडे, प्रकाश गौतम जोहरे, संजीवनी पुना बाच आणि आशिष भालेराव हे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, वरणगांव येथे उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आशाबाई कैलास बि-हाडे (वय 45, रा. सिद्धेश्वर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश काळे, निलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत आणि इतर 10 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. 018/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 189(1), 189(2), 189(3), 189(4), 118(1), 299 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या परिसरात शांतता असून, पोलीस सतर्क आहेत.