Published on
:
03 Feb 2025, 12:31 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:31 am
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी महसूल, समाज कल्याण, जिल्हा परिषदेसह संबंधित यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- टप्पा 2 ची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याबद्दल आबिटकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, सरपंच, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांचा सत्कार झाला.
आबिटकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून यावर्षी जिल्ह्यातील 44 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय योजनांमधून 10 हजार घरकुले अशी एकूण 50 हजारांहून अधिक घरकुलांचा लाभ देण्यासाठी नियोजन करा. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशापर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी अधिकार्यांनी एकमेकांशी समन्वयाने झोकून देऊन काम करा. यावेळी आ. डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपस्थित होते.