Published on
:
31 Jan 2025, 11:51 pm
Updated on
:
31 Jan 2025, 11:51 pm
सातारा : सातारा जिल्हा परिषदेत नोकरी लावतो, असे सांगून वकिलासह त्याच्या साथीदाराने 9 जणांना सव्वापाच लाख रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. तय्यब आलमगीर मुल्ला (वय 54, रा. संगमनगर, सातारा) व आशिष रमेश माने (वय 32, रा. कठापूर, ता. कोरेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुनील नारायम मोरे (वय 50, रा. करंजे नाका, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि.1 जानेवारी 2019 ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत वेळोवेळी घडली आहे. तक्रारदार सुनील मोरे यांचा मुलगा पदवीधर झाल्यानंतर तो नोकरी शोधत होता. याचवेळी तक्रारदार मोरे यांच्या संपर्कात ओळखीने अॅड. तय्यब मुल्ला हे आले. मुल्ला याने सातारा जिल्हा परिषदेत अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगितले. एक जागा भरण्यासाठी 55 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. क्लार्क पदासाठी हे बोलणे झाल्यानंतर तक्रारदार यांना अॅड. मुल्ला याने आशिष माने याची ओळख करुन देवून तोही नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
तक्रारदार यांनी ऑनलाईन पैसे पाठवले. तसेच तक्रारदार यांच्या मुलाप्रमाणेच इतर 8 युवकांसाठीही मुल्ला याने पैसे घेतले असल्याचे समोर आले. यामध्ये संकेत मोरेकडून 90 हजार, धनंजय मोरेकडून 55 हजार, विनोद फाळकेकडून 55 हजार, प्रतीक दुदुस्करकडून 55 हजार, सचिन वाघमळे, श्रीकृष्ण दुदुस्कर, प्रवीण वाघमळे, शितल वाघमळे या सर्वांकडून 55 हजार रुपये घेतले आहेत. पैसे दिल्यानंतर अॅड. मुल्ला याने नियुक्ती पत्र देखील दिले. मात्र, त्याआधारे नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर अखेर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयितांचा शोध घेतला त्यातील एकाला अटक करण्यात आली.
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) आशिष माने याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस वकिलाचा शोध घेत असून तो सापडलेला नाही. दरम्यान, फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जात आहे. फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.