ठसा – ललिता फडके

2 hours ago 1

>> श्रीप्रसाद प. मालाडकर 

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळकर- फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ललिता देऊळकर यांचा जन्म सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात नवरात्रीच्या ललिता पंचमीला झाला म्हणून त्यांचे नाव ललिता ठेवले. त्यांचे पिताश्री देऊळकर यांचा कापडाचा उद्योग होता. त्यांचे दोन काका उत्तम गायक होते. आजीचाही स्वर सुमधुर होता. घरातल्या सांगीतिक वातावरणामुळे ललिता देऊळकर यांच्या सुमधुर स्वरावर शास्त्राrय संगीताचे संस्कार गुरू दत्तोबा तायडे, पुरुषोत्तम वालावलकर, बाबुराव गोखले यांनी केले. शास्त्रीय संगीत त्या उत्तम गायच्या. संगीत शिकायचे, पण संगीत हे घरापुरते मर्यादित ठेवायचे. असा तत्कालीन सामाजिक संकेत होता. त्यांच्या शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी ललिता देऊळकर यांचे गायन ऐकलं तेव्हा ‘तुम्ही यांना सिनेमात का पाठवत नाही?’ असे विचारले.  हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यामुळे ललिता देऊळकर यांचा त्यावेळच्या ‘बॉम्बे टॉकीज’ संस्थेत प्रवेश झाला. सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री देविकाराणीसह ‘दुर्गा’ चित्रपटात एक भूमिका त्यांनी केली. ‘अंगुठी’ चित्रपटात त्या दोन गाणीही गायल्या आहेत. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये कार्यरत होत्या. सन 1947 च्या ‘साजन’ चित्रपटातले ‘हम को तुम्हारा ही आसरा, तुम हमारे हो न हो.’ हे मोहम्मद रफी आणि ललिता देऊळकर यांचे युगुलगीत आजही रसिकप्रिय आहे. पुढे 29 मे 1949 रोजी त्यांचा सुधीर फडके यांच्याशी विवाह झाला. त्या विवाहात हिंदी चित्रपटसृष्टीतले सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना मंगलाष्टकं गायचा मान मिळाला होता. ललिता देऊळकरच्या त्या ललिता फडके झाल्या. आकाशवाणी पुणे केंद्रातून दिनांक 1 एप्रिल 1955 पासून प्रसारित झालेल्या मूळ गीत रामायणातली कौसल्येची सर्व गाणी ललिता फडके यांनी गायली आहेत. अनेक हिंदी चित्रपटांसाठी तर, ‘उमज पडेल तर, चिमण्यांची शाळा, जन्माची गाठ, जशास तसे, प्रतापगड, माझं घर माझी माणसं, माय बहिणी, रानपाखरं, वंशाचा दिवा, सुवासिनी’ या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे त्यांनीच सुधीर फडके यांच्याकडे सुचवले होते. तेव्हा सन 1950 : ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातलं ‘आला चमकत बिजली जसा, माज्या जाळ्यात घावला मासा’ हे आशा भोसले यांनी सुधीर फडके यांच्याकडे गायलेले पाहिले गीत आजही रसिकप्रिय आहे. ललिता देऊळकर- फडके यांची रसिकप्रिय  गाणी अशी आहेत. दत्ता डावजेकर यांचे तुफान तुफान, तारू आलं किनाऱ्याला, नाखवा करू अंधारी शिकार, सजणा का तू रुसला, बोलू नको रे सजणा, किती बाई मन भ्याले, रामा कोठे शोधू तुला, तुझ्या डोळ्यात भरली जादू. उडून गेला गं पोपट, एकच टाळी झाली, देवा येसी का न येसी. उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, सावळा गं रामचंद्र, नको रे जाऊ रामराया, कदम उठा कर रुक नही सकता, तिन्ही सांज होता तुझी याद येते, रंगूबाई, गंगूबाई हात जरा चालू द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, लंगडा गं बाई लंगडा, नंदाचा कान्हा लंगडा, हम को तुम्हारा ही आसरा, तुम हमारे हो ना हो अशी असंख्य गीते ललिता फडके यांच्या नावावर आहेत.

ग.दि.मा. प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार ललिता फडके यांना मिळाला आहे. सुधीर फडके आणि ललिता फडके यांचे एकच सुपुत्र श्रीधर फडके, जे गायक, संगीतकार आहेत. ललिता फडके यांना सून चित्रा, दोन नाती : स्वप्ना श्रीधर फडके, प्रज्ञा श्रीधर फडके आहेत. संगीत संपन्न कृतार्थ जीवन जगलेल्या ललिता फडके यांचे 25 मे 2010 रोजी निधन झालं. ललिता फडके शरीराने आपल्यात नसल्या तरी त्यांचे संगीत, स्वर कालातीत आहे आणि राहील. कोणत्याही कलाकाराची परमेश्वराजवळ हीच प्रार्थना असते,

राहू ना राहू आम्ही, बनुनी फुले,

बनुनी स्वर सुगंध,

चिरहरित स्वरोद्यानात.’ 

 (लेखक, ज्येष्ठ प्रसिद्धीमाध्यम तज्ञ आहेत.)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article