दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार वाहन, घर व दागिने खरेदीचे सीमोल्लंघन:दीड महिन्यापूर्वीच केले दागिन्यांसह, फर्निचर अन् वाहनांचे बुकिंग

2 hours ago 1
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा सण असलेल्या दसऱ्यानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये एक दिवस आधीपासूनच खरेदीसाठी नागरिकांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. यंदा पाऊस चांगला झाल्याने नागरिक मनसोक्त खरेदी करत आहेत.नागरिकांचा विविध वस्तू, वाहने, उपकरणे खरेदीचा उत्साह पाहता यंदा अशा मोठ्या खरेदीचा नवा विक्रम गाठला जाण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे कपडे, पूजा साहित्य, झेंडूची फुले यांसह पारंपरिक सोने खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर खरेदीच्या पूर्व तयारीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. वाहनांचे बुकिंग तर दीड महिन्यापासून सुरु आहे. घटस्थापनेपासून कापड बाजार, सराफ बाजार, नवी पेठ, प्रोफेसर कॉलनी चौक, आदी बाजारपेठा गर्दीने फुललेल्या आहेत. या बाजारपेठेत शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी होती. शहरात चितळे रोड, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, बालिकाश्रम रोड, गुलमोहोर रोड, पाइपलाइन रोडवरील चौकाचौकात झेंडूच्या फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. नागरिकही जागोजागी थांबून फुलांची खरेदी करत होते. अनेकांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नवीन वाहने, वस्तू यांचे बुकिंग केले. दसरा आणि त्यापाठोपाठ येणारी दिवाळी या पार्श्वभूमीवर कापड बाजारपेठही सज्ज झाली आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल विक्रीसाठी आणला आहे. कापड बाजारात महिला, युवती व कुटुंबांची गर्दी होती. दसऱ्याच्या आदल्या दिवशी बाजारपेठेतील गर्दी पाहता मोठी उलाढाल होण्याची चिन्हे आहेत. दोन ठिकाणी रावणदहन शहरात विजयादशमीनिमित्त दोन ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दिल्लीगेट येथे रावणाचे प्रतिकात्मक दहन केले जाईल. तसेच सावेडी उपनगरात पारिजात चौकात देखील रावणदहन होणार आहे. एक दिवस अगोदर याची तयारी झाली आहे. लक्झरी फ्लॅटसह अपार्टमेंटला मागणी ^मूलभूत सुविधांसह महामार्गांची कनेक्टिव्हिटी आल्याने पुण्यात स्थायिक असलेले अनेक जण पुन्हा या अहिल्यानगर शहरात स्थायिक होण्यासाठी येत आहेत. मोठ्या शहरातील धावपळीचे जीवन असल्याने सर्व क्षेत्रातील लोक येथे राहण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सध्या लक्झरी फ्लॅटसह लक्झरी अपार्टमेंटला मागणी आहे. गुंतवणूक म्हणूनही रिअल इस्टेट या क्षेत्राकडे ग्राहक वर्ग पाहत आहे. - अमित मुथा, अध्यक्ष क्रेडाई ७० टक्के पारंपरिक दागिन्यांना मागणी ^ दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा सुवर्ण खरेदीत ७० टक्के पारंपरिक दागिन्यांना मागणी राहील. हलक्या व कमी वजनाच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. लग्नसराईसाठीही आताच खरेदीवर भर दिला जात आहे. - गुंजन शिंगवी, सराफा व्यावसायिक, अहिल्यानगर. झेंडुची फुले २००, तर शेवंती ३०० रुपये किलो दसऱ्याला घरोघरी फुलांचे तोरण बांधण्याची परंपरा असल्याने, फुलांना मोठी मागणी असते. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात झेंडू ६० ते ७० रुपये किलो होता, यंदा बाजारसमितीत झेंडू ५० ते १०० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रतिकिलोची १५० ते २०० रुपयां पर्यंत गेले, शेवंतीचे दरही यंदा ३०० रुपये किलोवर पोहोचले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article